शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीची सुट्टीत एन्जॉय करण्यासाठी राज्यातीलच खास ठिकाणं, थंडीचा घ्या आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 2:30 PM

1 / 10
Best Places Visit Winter : दिवाळीची सुट्टी लागण्याआधीच बरेचजण कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅनिंग करत असतात. याच दिवसात थंडीलाही सुरूवात झालेली असते. अशात या वातावरणात जर तुम्हाला हा थंडीचा आनंद घ्यायचा असेल, तर मित्र, जोडीदार अथवा फॅमिलीसोबत कुठेतरी लांब फिरायला जाण्याचा प्लान करा. यासाठी आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील काही खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जेथे तुम्ही थंडीचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. (Image Credit : holidify.com)
2 / 10
1) महाबळेश्वर - महाबळेश्वर हे सुंदर आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. येथील काही पॉईंट्स पाहण्यासारखे आहेत. महाबळेश्वर येथील सर्वात उंच पॉईंटसपैकी एक एलफिस्टन पॉईंट आणि विल्सनस पॉईटस हे आहेत. ह्या पॉईंटवरून सुद्धा नयनरम्य निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. तसेच ह्या ठिकाणी जुने महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर अशी पुरातन मंदिरं आहेत जी बघण्यासारखी आहेत. ह्या ठिकाणाहून कृष्णा नदीचा उगम होतो.
3 / 10
2) लोणावळा व खंडाळा - लोणावळा व खंडाळा मुंबई आणि पुण्याजवळील फेमस हिल स्टेशन आहे. गेल्या अनेक दशकांपासून पर्यटकांना भुरळ घालत आहे. लोहगड-विसापूर यांच्या वेढ्याने लोणावळ्याचे महत्त्व वाढले आहे. याशिवाय राजमाची किल्ला खंडाळ्यापासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. खोल दऱ्या, हिरवाईने नटलेला डोंगर आणि वाऱ्याचा मंद प्रवाह यामुळे लोणावळ्यातून निसर्गप्रेमींचा पायच निघत नाही.
4 / 10
3) गगनबावडा - कोल्हापूर पासून 55 किमी लांब असलेले गगनबावडा हे अतिशय सुंदर असं प्रेक्षणीय ठिकाण आहे. या गावाजवळ गगनगड किल्ला आहे. याठिकाणचे हिरवे डोंगर आणि धुक्यात हरवलेल्या दऱ्या हे या ठिकाणचे आकर्षण आहे. (Image Credit : Wikipedia)
5 / 10
4) माथेरान - मुंबईकरांसाठी माथेरान जवळ आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानला वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. हिवाळ्यात तर इथे फारच खास वातावरण असतं. माथेरानचे जंगल जैव विविधतेने संपन्न आहे. माथेरानच्या डोंगर दऱ्यातून ट्रेकिंग करताना याचा अनुभव येईल. डोंगर दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे माथेरानचं निसर्ग वैभव आहे. नेरळ हे येथे येण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक आहे.
6 / 10
5) पाचगणी - पुण्याहून १०० किलोमीटर असणारं पाचगणी राज्यातील सुंदर थंड हवेचं ठिकाण आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील पाच डोंगरांच्या मधोमध हे गाव वसलेलं आहे. येथील प्रसिद्ध टेबल लँड हे पठार आशियातील दुसरं मोठं ज्वालामुखीद्वारे तयार झालेलं पठार आहे. पाचगणीत बघण्यासारखे पॉईंट्स म्हणजे सिडनी पॉईंट,पारसी पॉईंट हे होत. सिडनी पॉईंटवरून धोम धरण व तलाव दिसतो तर पारसी पॉईंटवरून कृष्ण नदीचे मोठे पात्र बघता येते.
7 / 10
6) चिखलदरा - चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील एक शहर आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात तुम्ही इथे थंडीचा छान आनंद घेऊ शकता. धबधबे, डोंगरदऱ्यांसोबत अनेक स्पॉट इथे बघता येतात. येथील वातावरण हे प्रेमात पाडणारं असतं. अमरावतीहून इथे जाण्यासाठी सतत बसेस सुरू असतात. इथे 12 पेक्षा जास्त स्पॉट बघायला मिळतात. ज्यात इको पॉईंट. देवी पॉईंट, नर्सरी गार्डन, प्रॉस्पेट पॉईंट, बेलाव्हिस्टा पॉईंट, बेलेन्टाईन पॉईंट, भीमकुंड,‎ मंकी पॉईंट, लॉग पॉईंट यांचा समावेश आहे.
8 / 10
7) अजिंठा-वेरूळ - राज्यातील प्राचीन अजिंठा-वेरूळ हे ठिकाण फारच सुंदर आहे. या दिवाळ्याची सुट्टीत तुम्ही इथे भेट देऊ शकता. सातवाहन,वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्माण केलेल्या लेण्या इथे बघू शकता. बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण औरंगाबादपासून 100 कि.मी. ते 110 कि. मी. वर आहे. येथील लेण्या शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत.
9 / 10
8) ताडोबा - विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालाही तुम्ही हिवाळ्यात भेट देऊ शकता. हिवाळ्यात इथे खूपच थंडी असते. या थंडीत जंगल सफारीचा तुम्ही चांगला आनंद घेऊ शकता. पण इथे जाण्यासाठी आधी बुकिंग करावं लागतं.
10 / 10
9) कोकण - कोकणात तर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही थंडीसोबतच समुद्राचाही आनंद घेऊ शकता. सिंधुदुर्ग, अलिबाग, गुहागर, रत्नागिरी, मालवण, दापोली असे अनेक पर्याय तुम्हाला इथे मिळतील. येथील निसर्गरम्य वातावरणात तुम्ही खूप एन्जॉय करू शकाल.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सMaharashtraमहाराष्ट्र