- अमृता कदमआपल्या शहरी आयुष्यातून चिमण्या, पोपट, बुलबुल, साळुंख्या असे नेहमी दिसणारे पक्षी आता गायबच होत चालले आहेत. नाहीसे होणारे अधिवास, प्रदूषण, आपली स्वत:च्या पलिकडे न पाहण्याची वृत्ती अशी अनेक कारणं त्यामागे आहेत. त्यामुळेच पक्षीसृष्टीची जादू अनुभवायची असेल, त्यांचा किलबिलाट ऐकायचा असेल तर तुम्हाला पक्षीअभयरण्यांना भेट देण्याशिवाय पर्याय नाही. भारतात हिमालयाच्या कुशीपासून दक्षिणेतल्या सदाहरित जंगलांपर्यंत आणि पश्चिमेला गुजरातपासून ते पूर्वेला अरूणाचल प्रदेशपर्यंत अनेक पक्षीअभयारण्यं आहेत, जिथे तुम्हाला पक्षांच्या वेगवेगळ्या प्रजाती पहायला मिळतात.1. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क( उत्तराखंड)देशातल्या या सर्वांत जुन्या नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला पक्षांच्या दुर्मिळ प्रजाती पहायला मिळतात. पक्षी निरिक्षणासाठी सोलुना रिसॉर्ट आणि कलगढ बांध सारख्या खास जागाही आहेत. मैहपाई-रोबिन, बुलबुल असे पक्षीही ठराविक काळासाठी इथे स्थलांतर करु न येतात.2. भरतपूर पक्षी अभयारण्य (राजस्थान)भरतपूरमधलं केवलादेव घाना राष्ट्रीय पक्षी उद्यान हे देशातलं सर्वांत मोठं पक्षी अभयारण्य आहे. इथे येणाऱ्या स्थलांतरित पक्षांच्या अनेक प्रजातींमुळे हे अभयारण्य विदेशी पर्यटकांच्या तसंच अभ्यासकांच्याही आकर्षणाचा भाग आहे. क्रेन , पेलिकन, गरूडाच्या वेगवेगळ्या जाती तुम्हाला पहायला मिळतात. 3. चिल्का पक्षी अभयारण्य (ओडिशा)तब्बल 1100 स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरात पसरलेलं हे अभयारण्य पक्षीनिरीक्षणासाठीचा स्वर्गच आहे. चिल्का सरोवरात छोटी छोटी बेटं आहेत, जिथे अनेक रंगीबेरंगी पक्षांचं वास्तव्य असतं.4. सुलतानपूर पक्षी अभयारण्य ( हरियाणा)या अभयारण्यामध्ये तुम्हाला पक्षांच्या स्थानिक आणि स्थलांतरित अशा दोन्ही प्रजाती पहायला मिळतात. पिंटेल, ग्रेटर फ्लेमिंगो, कॉमन टील आणि सायबेरियन क्र ेन ही इथली मुख्य आकर्षणं आहेत.5. सलीम अली पक्षी अभयारण्य (गोवा)गोव्याला जायचं म्हणजे इथली बीचेस आणि चर्च पाहायची असाच अनेकांचा समज असतो. पण गोव्यातलं हे पक्षी अभयारण्य देशातल्या सर्वांत उत्तम अशा पक्षी अभयरण्यापैकी एक आहे. इथली शांतता आणि चिमण्यांचा चिवचिवाट तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. 6. नल सरोवर पक्षी अभयारण्य ( गुजरात)अहमदाबाद शहरामध्ये विकसित केलेलं हे अभयारण्य फिरण्यासाठी एक अत्यंत सुंदर जागा आहे. हे अभयारण्य घुबडांच्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे.7. कुमारकोम पक्षी अभयारण्य ( केरळ)वेंबनाड तलावाच्या परिसरात हे अभयारण्य वसलेलं आहे. कोकिळ, घुबड, ब्राह्निणी, ससाणे, बगळे आणि पोपटांच्या वेगवेगळ्या जाती पहायला मिळतात. इथल्या हवामानामुळे तुम्ही इथे जून ते आॅगस्ट महिन्याच्या दरम्यानही जाऊ शकता. स्थलांतरित पक्षी पहायचे असतील तर मात्र नोव्हेंबर ते फेब्रुवारीचा कालावधी उत्तम.8. इगलनेस्ट अभयारण्य (अरूणाचल प्रदेश)बर्ड लाइफ इंटरनॅशनलनं इगलनेस्ट अभयारण्याला ‘अत्यंत महत्त्वाचा पक्षी विभाग’ म्हणून घोषित केलं आहे. इथल्या प्रसिद्ध अशा लामा कँपमध्ये अत्यंत सुंदर आणि अनोखे पक्षी पहायला मिळतात. ईगलनेस्टचं वैशिष्ट्य म्हणजे पक्षांच्या विविध जातींसोबतच फुलपाखरांच्या जवळपास 165 जाती आढळतात. 9. लावा आणि नेओरा घाटी राष्ट्रीय उद्यान (पश्चिम बंगाल)पक्षीप्रेमींसाठी ही जागा म्हणजे ‘बर्डिंंग मील’च! इथे सच्चर ट्रॅगॉन, व्हाइट-टेल्ड रॉबिन आणि रस्टी-बेलिड शॉर्टविंग अशा अनेक दुर्मीळ प्रजाती इथे आढळतात. पण मान्सूनमध्ये हे अभयारण्य तीन महिन्यांसाठी बंद असतं.10.थिटेकड पक्षी अभयारण्य (केरळ)पक्षीतज्ज्ञ सलीम अलींनी या अभयारण्याला ‘भारतातलं सर्वांत श्रीमंत अभयारण्य’ म्हणून गौरवलं आहे. हे अभयारण्य कोकिळांच्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. किंबहुना या अभयारण्याला ‘कोकिळांचा स्वर्ग’ असंही म्हटलं जातं. मलबार ग्रे हॉर्निबल या प्रजातीचंही हे निवासस्थान आहे. जगभरातील पक्षीनिरीक्षक इथे अभ्यासाठी येतात. निसर्गसौंदर्याचा आनंद आणि सान्निध्य अनुभवायचं असेल तर तुम्ही कधीही या अभयारण्यांना भेट देऊ शकता. मात्र जर स्थलांतरित पक्षांच्या वेगवेगळ्या जाती मोठ्या संख्येनं पाहायच्या असतील तर या अभयारण्यांना भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे आॅक्टोबर ते मार्च! तुम्ही अगदी हौशी पक्षीनिरीक्षक नसला तरी वेगवेगळे पक्षी पाहण्याचा आनंद घेण्यासाठी एकदा तरी यातल्या एखाद्या अभयारण्याला नक्कीच भेट द्यायला हवी.