- अमृता कदमगोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात एकापेक्षा एक सुंदर बीचेस, चर्चेस, उत्तमोत्तम क्लब्ज आणि रेस्टॉरण्ट्स. गोव्यातल्या याच गोष्टींसाठी बरेचजण गोव्याला भेटी देतात. या साचेबद्ध पर्यटनस्थळांच्या पलिकडेही एक गोवा आहे, ज्याचं साधं सौंदर्य आकर्षून घेणारं आहे. गोव्यातली अनेक छोटी-छोटी गावं आहेत, जिकडे पर्यटकांची पावलं अजूनही वळलेली नाहीत.या गावांमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पोर्तुगीज पद्धतीचे काही व्हिला पहायला मिळतील. तिथूनच तुम्ही या गावांच्या प्रेमात पडायला लागाल. गोव्यातल्या गावांमधले अनेक जणं कामानिमित्त बाहेर आहेत. बहुतांश घरांमध्ये परदेशी असलेल्या मुलांचे पालकच वास्तव्याला असतात. त्यामुळे तुम्हाला या गोवन घरांमध्ये होम स्टे ची सुविधा सहज मिळू शकते. किंबहुना अनेक जणांनी आपल्या घरांची जाहीरातही Airbnb वर देऊन टाकली आहे. एकदा का तुमची राहण्याची व्यवस्था झाली की, तुम्ही भटकायला मोकळे. हिरव्यागार वनराईने नटलेल्या या गावांमध्ये फिरताना तुमचा थकवा कुठल्या कुठे निघून जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा...या गावांमधला दिवस खूप लवकर सुरु होतो आणि रात्री आठनंतर सामसूम व्हायला सुरूवात होते. निवांतपणाबरोबरच तुम्ही मौजमजेच्या मूडमध्ये असाल तर या गावांना लागून असलेल्या शहराचा रस्ता धरु शकता. वाहन हातात असेल तर गावांपासून शहरांचा प्रवास एक-दीड तासांचा आहे. गोव्यातल्या पर्यटनामधली ही सर्वांत सोयीची बाजू.साधारणपणे गोव्याला गेल्यावर रेस्टॉरण्टमध्ये आपण सी-फूडच ट्राय करतो. पण छोट्या गावांमध्ये तुम्हाला इथल्या पारंपरिक स्थानिक पदार्थांचीही चव चाखायला मिळेल. तुमच्या दिवसाची सुरूवात सायकलवरु न पाव विकणाऱ्या पाववाल्यांच्या आवाजानं होईल. त्यांच्याकडे मिळणारा पोई नावाचा पाव एकदा खाऊन पाहायलाच हवा. गोवेकरांना या पावाची पहिली ओळख करून दिली पोर्तुगीजांनी. गोव्यामध्ये गोडसर चवीचा, डीप फ्राय केलेला ब्रेड म्हणजेच ‘बॉन’ही आवडीनं खाल्ला जातो. गोव्याशिवाय मंगलोरमध्येही हा बॉन खायला मिळतो. तिथे हा मंगलोरी बन म्हणून ओळखला जातो. आपल्याकडची बटाट्याची भाजी गोव्यातल्या या गावांमध्ये थोडं वेगळं रु प आणि चव घेऊन कापा म्हणून समोर येते. शिवाय भोपळ्यांच्या फुलांची, शेवग्याच्या फुलांची भाजीही या छोट्या गावांमध्ये आवर्जून खायला मिळते. गोव्यातलं अजून एक आकर्षण म्हणजे इथली फेणी. जर तुम्ही फेब्रुवारी ते मेच्या दरम्यान गोव्याला गेलात, तर तुम्हाला इथल्या काजूच्या बागा, काजूची फळं आणि त्यापासून बनवली जाणारी फेणी हे सगळं पहायला मिळू शकतं. गोव्यामध्ये काजूच्या बागा आहेत आणि फेब्रुवारी ते मे या काळात म्हणजे जेव्हा फळं तयार होतात तेव्हा इथले गावकरी आपापल्या बागांची निगराणी करतात. फळांची तोडणी, फळांपासून बिया वेगळ्या करणं, नंतर ही फळं आंबवून त्यापासून फेणी करणं हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता. इथल्या बॅकवॉटर्सचा फेरफटका मारु न तुम्ही इथे चालणारी मासेमारी पाहू शकता. गोव्यातल्या लहान गावांमध्येही चर्चेस आहेत. या चर्चेसच्या प्रांगणात संध्याकाळी काही कार्यक्र मही केले जातात. दिवसभर फिरु न कंटाळल्यावर तुम्ही इथे कोकणी नाटकाचा किंवा आणखी कोणत्यातरी सांस्कृतिक कार्यक्र माचा आनंद घेऊ शकता.आणि हो, गोवन गावांमध्ये आल्यावर तुम्ही तुमच्या रोजच्या कामाच्या गडबडीत जी गोष्ट करत नाही ती आवर्जून करा, ती म्हणजे लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठून पहाट अनुभवणं! गोव्यातल्या गावांमधला हा अनुभव तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत असाच असेल!