- अमृता कदमविमानातून खाली पाहिल्यावर निळ्याशार समुद्रात हिरव्याजर्द ठिपक्यांची माळ दिसली की समजावं मालदीव आलं. प्रवाळ बेटांनी बनलेला मालदीव हा देश गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय पर्यटकांची पसंती बनला आहे. बऱ्याचदा मालदीवला भेट देणारे पर्यटक हे राजधानी माले आणि आसपासच्या बेटांना भेट देऊन परत येतात. पण जर तुम्हाला निवांतपणे मालदीवच्या सागरी सौंदर्याची अनुभूती आणि आस्वाद घ्यायचा असेल तर इथल्या थोड्याशा अनएक्सप्लोअर्ड बेटांनाही भेट द्या.* मालदीवमधल्या तुमच्या अनवट प्रवासाला सुरूवात करायला गॅन बेटांशिवाय उत्तम पर्याय दुसरा कोणताही नाही. अद्दू अटोल इथे वसलेलं हे मालदीवमधलं सर्वांत मोठं बेट आहे. गॅन बेटांना इतिहास आहे. हे बेट 1941 ते 1976 या काळात ब्रिटीशांच्या नौदलाचा महत्त्वाचा सामरिक तळ म्हणून वापरलं जात होतं. त्यानंतर रॉयल एअर फोर्सनंही या तळाचा वापर केला. या ब्रिटीशकालीन इतिहासाच्या खुणा आजही या शहरात जागोजागी पाहायला मिळतात. ब्रिटीश स्थापत्यशैलीचा वापर करून बांधलेली घरं, सिनेमागृहं, नाट्यगृहं आजही उत्तम अवस्थेमध्ये आहेत.* गॅनमध्ये थांबून तुम्ही आजूबाजूची ठिकाणं पाहू शकता. त्याची सुरूवात हिथादू बेटांपासून करा. गॅनपासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर हे बेट आहे. या सतरा किलोमीटरच्या प्रवासात तुम्हाला इथल्या निसर्गसौंदर्याची झलक पाहायला मिळते. केळीची झाडं आणि समुद्रकिनाऱ्यावरच्या वाऱ्यानं वाकणारी माडाची झाडं पाहतानाच तुमच्यामध्ये निवांतपणाचं फीलिंग यायला सुरूवात होते. हिथादू बेटांवर समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्याबरोबरच तुम्ही इथल्या ब्रिटीश वॉर मेमोरियललाही भेट देऊ शकता. हिथादू बेटांवर या देशातल्या सर्वांत मोठ्या तलावांपैकी एक तलाव आहे. इथे तुम्हाला अनेक स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. शिवाय इथली आजबाजूची जैवसंपदाही खास आहे.* हिथादू बेटांनंतरचा तुमचा पुढचा टप्पा असेल माराधू बेटाचा. इथे अत्याधुनिक पद्धतीचं बोट यार्ड आहे. इथे स्थानिक कारागीर मालदीवन पद्धतीच्या मासेमारीच्या बोटी बनवताना तुम्हाला पहायला मिळतात. इथले मच्छिमार तुम्हाला बोटी कशा बनवतात हे समजावूनही सांगतात. इथलं अतिशय साध्या पद्धतीचं राहणीमान आणि या बेटावरची जैवविविधता तुम्हाला मोहून टाकते.* हिथादू आणि माराधू बेटांप्रमाणेच अतिशय छोटं आणि सुंदर बेट आहे मीधू. असं म्हणतात की मालदीवमध्ये मीधू बेटावरच्या रहिवाशांनी सर्वांत प्रथम इस्लामचा स्वीकार केला. इथल्या बीचेसवर माडाच्या राईसोबतच दुसऱ्या महायुद्धाच्या काही खुणाही पहायला मिळतात. * मालदीवमधल्या या छोट्या बेटांवर तुम्हाला तिथल्या स्थानिक खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येतो. नारळाचा वापर करु न बनवलेला ट्युना मासा लाजबाब! त्याचबरोबर वाहू, पॅरट फिशसारखं सी-फूड शिवाय पपई, केळी, नारळ वापरून बनवलेले गोडधोड पदार्थ तुम्हाला अगदी तृप्त करतात. आणि हे सगळं जर एखाद्या मालदीवन व्यक्तीच्या घरी मिळालं तर सोने पे सुहागा! एवढी भटकंती आणि पोटपूजा झाल्यानंतर जरा समुद्रात डुबकी मारून निळ्या समुद्रातली रंगीबेरंगी जीवसृष्टी पाहा. अंडरवॉटर डायव्हिंग करून तुम्ही खास इथेच आढळणारे सागरी जीव पाहू शकता. अगदीच खोलात शिरायचं नसेल तर बोटीतून दिसणारे डॉल्फिनही तुम्हाला आनंद द्यायला पुरेसे आहेत. जर मालदीवची सफर करायचं ठरवत असाल तर टूरिस्ट मॅन्युअलमध्ये दिलेली तीच तीच ठिकाणं पाहण्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहण्याचा प्रयत्न नक्की करा.