- अमृता कदममान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घ्यायला प्रत्येकचजणच उत्सुक झाला आहे. पण घरात बसून गॅलरीतून किंवा खिडकीत बसून धो धो कोसळणारा पाऊस बघणं म्हणजे पावसाचा आनंद घेणं नव्हे. पावसाचा खरा आनंद मिळतो तो पावसाळ्यातल्या भटकंतीनंच. पावसासोबत शरीर आणि मन ओलं करून निसर्गाचा आनंद घेत केलेली भटकंती करणं म्हणजे पावसाचा खरा आनंद घेणं होय. म्हणूनच पावसाळ्यातली एखादी मस्त ट्रीप आताच प्लॅन करा. पावसाळ्यातल्या भटकंतीसाठी फार लांब जायचीही गरज नाही. पावसाचा रोमांचक अनुभव देतील अशी अनेक ठिकाणं महाराष्ट्रातच आहेत.पावसाळ्यातली भटकंती 1.माथेरानमुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या या हिलस्टेशनला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. पण पावसाळ्यातला माथेरानचा नजारा काही औरच आहे. इथल्या गर्द झाडीतून धो-धो कोसळणाऱ्या पावसात लाल मातीच्या वाटा तुडवायच्या...मध्येच थांबून वाफाळता चहाचा कप किंवा गरमागरम मक्याचं कणीस मिळाल्यावर तर अजून काय हवं? तुमच्याकडे गाडी असेल तर ठीकच, पण जर नसेल तर मुंबईपासून नेरळपर्यंत लोकल आहे. तिथून तुम्हाला माथेरानला जायला गाडी मिळू शकते. हॉटेलसोबत माथेरानला होमस्टेच्याही सुविधा उपलब्ध आहेत.2.भंडारदरागेल्या काही वर्षांत मान्सून ट्रीपसाठी भंडारदरा हे तरु णाईचं आवडतं ठिकाण आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या या ठिकाणी ट्रेकिंगसाठी योग्य अशी अनेक ठिकाणं आहेत. प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारदऱ्यात धबधबे, भंडारदरा तलाव, रतनगड, हरिश्चंद्रगड सारखी ठिकाणं आहेत.3.कास-तापोळापुष्पपठारामुळे कास आता अनेकांच्या परिचयाचं झालं आहे. इथे साधारण सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात फुलणारी फुलं पहायला तर पर्यटक गर्दी करतातच, पण पावसाळ्यातही कासचं सौंदर्य पाहण्यासारखं असतं. कासला जोडूनच तुम्ही पुढे तापोळ्यालाही जाऊ शकता. डोंगरराजीनं वेढलेलं तापोळा पावसाळ्यात ढगांची चादर लपेटतं. तापोळ्यात तुम्ही बोटिंग आणि राफ्टींगचाही आनंद घेऊ शकता.4.भीमाशंकरभीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. पण तितकंच ते प्रसिद्ध आहे इथल्या निसर्गसौंदर्यासाठी आणि अभयारण्यासाठी. हिरवळ आणि पावसाळ्यात फुटणारे अनेक झरे भीमाशंकरच्या सौंदर्यात भर टाकतात. पुण्यापासून भीमाशंकर 127 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून भीमाशंकरला जायला एसटीही आहेत. 5.माळशेज घाटपुणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणांहून माळशेज घाट जवळ आहे. त्यामुळेच इथल्या धबधब्यांखाली ऐन पावसात भिजायला नेहमीच गर्दी होत असते.6.दिवे-आगर-हरिहरेश्वरपावसाळ्यात उधाणलेला समुद्र पहायचा असेल तर कोकणात जायलाच हवं. दिवे आगर आणि हरिहरेश्वरचे समुद्रकिनारे हे स्वच्छ, शांत, निवांत आहेत. इथे पर्यटकांची फारशी वर्दळही नसते. इथे होम स्टेची सुविधा तर उपलब्ध आहेच. शिवाय घरगुती पद्धतीनं बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या माशांवरही मस्त ताव मारता येतो. अर्थात पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर आपल्या हौसेला थोडी मर्यादाही घालून घ्यायला हवी. तरच प्रवासाचा आनंद सुरक्षितपणे घेता येतो.7.कळसूबाईमहाराष्ट्रातलं हे सर्वोच्च शिखर.साहसाची हौस असेल तर ऐन पावसाळ्यात कळसूबाईचा ट्रेक करायला हरकत नाही. पण पावसाळ्यात जोरात वाहणारे वारे तुम्हाला वर चढताना चांगलाच त्रास देतात. शिवाय इथल्या शिड्या आणि वाटाही निसरड्या झालेल्या असू शकतात. त्यामुळेच जर तुम्ही कसलेले ट्रेकर असाल तरच पावसाळ्यात या ट्रेकच्या फंदात पडा.8.ठोसेघरचा धबधबासातारा जिल्ह्यातलं हे ठिकाण अजूनही पुरेसं एक्सप्लोअर केलं गेलेलं नाहीये. पण ज्यांना शांत, निवांत आणि निसर्गानं ओतप्रोत भरलेल्या ठिकाणी जावंसं वाटतं त्यांच्यासाठी ठोसेघर अगदीच उत्तर पर्याय आहे. पुण्यापासून फक्त तीन तासांच्या अंतरावर ठोसघर आहे. ठोसेघरचा धबधबा पाहाणाऱ्याला वेड लावतो. 9) लोणावळालोणावळा हे पर्यटनस्थळ म्हणून खूपच परिचित झालेलं आहे. पण तरीही इथला टायगर पॉइंट पावसाळ्यात अवश्य पाहावा असाच आहे. निसर्गातल्या सौंदर्याची पावसाळी जादू तिथे नक्की अनुभवायला मिळते.10. कोलाडरिव्हर राफ्टिंगचा परवडणारा अनुभव घ्यायचा असेल तर मग कोकणातल्या कोलाडला जायलाच हवं. कुंडलिका नदी, आजूबाजूच्या जंगलामुळे पसरलेली हिरवळ यामुळे निसर्गप्रेमी पावसाळ्यात कोलाडला गेले की निसर्गसुखाच्या आनंदानं चिंब होतात. पावसाळ्यात कोलाडमध्ये घालवलेला एक दिवस तुमची पावसाळी ट्रिप नक्की सार्थकी लावते.