-अमृता कदममे महिना सरत आलाय. उकाडा हळू हळू वाढतोच आहे. अजूनही कुठे जर फिरायला गेला नसाल तर एक हिल स्टेशन गाठाच. पण यासाठी आधी टूरिस्ट गाइडमधल्या हिलस्टेशन्सला फाटा द्या आणि एकदम नवीन ठिकाण एक्सप्लोअर करा. यासाठी बेस्ट आॅप्शन आहे धनौल्टी. निसर्गानं मुक्त हस्तानं सौंदर्याची उधळण केलेलं हे उत्तराखंडमधलं छोटंस हिलस्टेशन. गजबजाटापासून दूर, शांत आणि निवांतही! डेहरादूनपासून धनोल्टी दोन तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही डेहरादून-धनौल्टी असाही प्लॅन करु शकता. डेहरादूनहून प्रवासाला सुरूवात केल्यावर वाटेत देवदारांची गर्द झाडी धनौल्टीमध्ये तुम्हाला काय नजारा पहायला मिळणार आहे याची झलक दाखवून देतात. वाटेत लागणारी टुमदार पहाडी गावं मागे टाकत तुम्ही धनौल्टीला पोहचता. समुद्रसपाटीपासून 7500 फूट उंचावरच्या या हिलस्टेशनचं उन्हाळ्यातलं तापमान असतं 21 डिग्रीपर्यंत असतं, तर थंडीत पारा 1 अंशापर्यंत खाली उतरतो. इथे पोहचल्यावरच तुम्ही ठरवून टाका आता कसलीही घाईगडबड नाही, सारं कसं शांत अन निवांत.सुरकंडा देवीचं मंदिर आणि इको पार्कधनौल्टीमध्ये फिरण्यासाठी मोजकीच ठिकाणं आहेत, पण सगळीच अतिशय सुंदर. त्यांपैकीच एक म्हणजे सुरकंडा देवीचं मंदिर. आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेत जायचं असेल तर सरळ पायी निघा. मंदिराकडे जाताना छोटीछोटी दुकानं लागतात. चहा-नाश्त्यापासून गढवाली आणि अन्यपद्धतीच्या कारागिरीच्या वस्तू तुम्हाला मोहात पाडू शकतात. पण इथे फार न रेंगाळता तुम्ही सरळ मंदिरात जा. या प्रशस्त, स्वच्छ आणि सुंदर मंदिरात तुम्हाला मन:शांतीचा मन:पूत अनुभव येईल, जो शहरातल्या धावपळीत सध्या मिसिंग असतो. मंदिरासोबतच इथे अजून एक खास जागा आहे ती म्हणजे इको पार्क. पंधरा एकरांच्या परिसरात पसरलेल्या पार्कमध्ये वळणावळणाच्या पायवाटा, फुलांनी डवरलेली झाडं, ध्यानधारणेसाठी काही खास पॉइंट आहेत. शिवाय मनोरंजनासाठी बर्मा ब्रिज, फ्लाइंग फॉक्ससारखी आकर्षणंही आहेत. तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल तर तुमच्या कॅमेऱ्याला इथे बरंच काही मिळून जाईल. इथून साधारण 200 मीटरच्याच अंतरावर अजून एक इको पार्क आहे. धनौल्टी हाइटस आणि इको हटसधनौल्टीमध्ये पर्यटकांच्यादृष्टीनं राहण्याच्या फारशा सुविधा विकसित झालेल्या नाहीत. पण इथल्या काही मोजक्या हॉटेल्सपैकी गढवाल मंडल विकास निगमचं ‘धनौल्टी हाइट्स’ हे राहण्यासाठी चांगल आहे. रूमच्या बाहेर संध्याकाळी मस्तपैकी खुर्ची टाकून निसर्गाची शोभा पहायची. विशेषत: रात्री निरभ्र आकाशात चांदण्या पाहण्याचा आनंदच काही और आहे.जर हॉटेल रूम्समध्ये रहायचं नसेल तर तुम्ही इथल्या टुमदारशा इको हट्समध्येही राहू शकता. ही इको हट्स उत्तमरित्या मेण्टेन केलेली आहेत. इथलं वैशिष्ट्य म्हणजे या इको हट्समध्ये पूर्णपणे सौर उर्जेचा वापर करून वीज, टीव्ही, फोन चार्जर, गरम पाणी या सगळ्या सुविधा मिळतात. समोरच्या लॉनमध्ये देवदारच्या झाडाखाली बसून चहा आणि नाश्त्यावर ताव मारताना सगळं काही विसरायला होतं. डेहरादूनधनौल्टी हे काही खूप फिरण्यासारखं नाही, तर शांतपणे राहण्यासारखं ठिकाण आहे. त्यामुळे तुम्ही डेहरादूनलाही एखाद-दोन दिवस घालवू शकता. धनौल्टीहून जेव्हा तुम्ही डेहरादूनला परत येता तेव्हा तुम्हाला वाटेत पाहण्यासारखी दोन ठिकाणं आहेत एक म्हणजे शिव मंदिर आणिदुसरं म्हणजे रॉबर्स केव्हज. डेहरादूनच्या चौदा किलोमीटर अलिकडे असलेलं हे शिवमंदिर पहायला वाट वाकडी करण्याचीही गरज नाही. रस्त्याला लागूनच असलेलं हे भव्य मंदिर तुमचं लक्ष वेधून घेईलच. डेहरादूनला पोहचल्यावर तुम्ही रॉबर्स केव्हसला जाऊ शकता. इथले रहिवासी याला ‘गुच्चुपानी’ म्हणतात. इथे गुडघ्यापर्यंत पाणी असलेली कातळांमध्ये दडलेली भुयारासारखी लांब वाट आहे. या थंड पाण्याचा स्पर्श, हलका-हलका काळोख तर कधी चुकूनमाकून डोकावल्यासारखी वाटणारी प्रकाशाची तिरीप. हा अनुभव तुम्ही आयुष्यभर विसरु शकणार नाही. उन्हाळ्याचे आता थोडेसेच दिवस राहिले आहेत, त्यामुळे आता फार विचार न करता धनौल्टीच्या ट्रीपचं प्लॅनिंग करून टाकाच्. पाच-सहा दिवस उकाड्यापासून दूर जावून एक कूल कूल अनुभव तुम्ही नक्की घेवू शकता.