- अमृता कदमफिरायला जायचं म्हटलं की सुट्टयांचं नियोजन, तिकीटाचं बुकिंग, हॉटेल बुकिंग अशा एक ना अनेक गोष्टींचं काटेकोर नियोजन केलं जातं. पण असं कोणतंही प्लॅनिंग न करता, मस्तपैकी भटकायची लहर आल्यामुळे पाठीवर बॅगपॅक टाकून अगदी अडनिडं ठिकाण गाठणारे मस्तमौला भटकेही असतात. सोलो ट्रीप किंवा एकट्यानंच अगदी लांबच्या ठिकाणी प्रवासाला निघणं ही काही आता नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. पण तरीही अशा भटक्यांना लोकांच्या अनेक प्रश्नांना आणि चौकशांना सामोरं जावं लागंत. तुम्ही जर असेच प्रवासवेडे असाल तर तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या काही कॉमन प्रश्नांसाठी तयारीत राहिलेलं चांगलं! तुला कोणी मित्र नाही का?एकट्यानं अशा उचापती करण्याची गरजच काय? असा प्रश्न विचारणाऱ्यांना सांगा की मला मित्र-मैत्रिणी आहेत. पण मला स्वत:साठी वेळ द्यायला आणि स्वत:सोबत वेळ घालवायला आवडतं. शिवाय एकट्यानं प्रवास करताना तुम्ही तुमच्या व्यक्तीमत्त्वाचे वेगवेगळे पैलू तपासून पाहता. स्वत:ला शोधण्याचा प्रवास हा उत्तम मार्ग आहे.मुलींसाठी असं एकट्यानं भटकणं सुरक्षित नाही.कोणाची तरी सोबत असेल तरच तुम्ही सुरक्षित असता ही कल्पनाच आता मागे पडतीये. जर काही वाईट घडणार असेल तर ते सोबत असतानाही होऊच शकतं. तुम्ही प्रवासाचं नीट नियोजन केलं असून स्वत:च्या सुरक्षिततेसाठीची खबरदारीही व्यवस्थित घेतली असल्याचं सांगून तुमच्या पालकांना आणि मित्रमंडळींना तुम्ही निश्चिंंत करु शकता. सुरक्षेसाठीच्या वेगवेगळ्या अॅपची माहिती तुम्ही तुमच्या पालकांना द्या. तसंच तुम्ही जिथे राहत आहात तिथली नीट माहिती त्यांना देऊन ठेवा. एकट्यानं फिरणं कंटाळवाणं.असतं का ?अजिबात नाही! सध्याच्या जगात कंटाळा येणं ही तशी दुर्मिळच गोष्ट झाली आहे. जेव्हा तुम्ही फिरत असता तेव्हा तुम्ही नवीन लोकांना भेटत असता, नवनवीन ठिकाणं पाहत असता आणि वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जात असता. यातून जो काही वेळ उरतो, तेव्हा स्मार्ट फोन आणि अलिबाबाच्या गुहेतल्या खजिन्याप्रमाणे त्यात असणारे असंख्य फीचर्स असतातच! कंटाळ्याचा प्रश्नच कुठे येतो! असं एकट्यानं मजा करणं स्वार्थीपणा नाही का?या प्रश्नावर तर ठामपणे ‘नाही’ असंच उत्तर द्या. एकट्यानं मजा करणं स्वार्थीपणा नाही तर मला आयुष्यात एकट्यानं हा आनंद घेऊ न देणं हा स्वार्थीपणा आहे हे असं तुम्ही नि:संकोचपणे म्हणू शकता. एकलकोंडी लोकंच अशी एकटी भटकतात का? खरंतर ज्याला कोणालाही स्वत:ची कंपनी मनापासून एन्जॉय करता येते, अशी व्यक्ती एकट्यानं फिरु शकते. त्यामुळे लगेचच स्वत:ला एकलकोंडं किंवा माणूसघाणं समजण्याचं काही एक कारण नाही. इतर कोणाच्याही आधी स्वत:ला प्राधान्य देणं गैर नाही. त्यामुळे लोकांच्या या आणि अशा प्रश्नांना बिनधास्त सामोरं जा. कुछ तो लोग कहेंगे असं म्हणत अशा शंकासुरांचं म्हणणं फार मनाला लागू न देता मस्तपैकी फिरायला बाहेर पडा. स्वत:सोबत छान वेळ घालवा.