Shiv Jayanti : must visit forts in maharashtra
Shiv Jayanti : महाराष्ट्रातील 'या' किल्ल्यांनी स्वराज्य स्थापनेत मोलाचे योगदान दिले! By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 4:17 PM1 / 10'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' या शब्दांमध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या महाराष्ट्राचे वर्णन कवी गोविंदाग्रजांनी केलं आहे. याच कणखर सह्याद्रीच्या विश्वासावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. सह्याद्रीच्या मातीत तयार झालेले राकट मावळे आणि सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये वसलेले किल्ले यांच्या साथीने महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि भल्याभल्यांना सळो की पळो करून सोडले. स्वराज्यात महाराजांनी आणलेला प्रत्येक किल्ला आजही महाराजांचा इतिहास जीवंत करतो. त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीनेही हे किल्ले महत्त्वाचे आहेत. जाणून घेऊयात महाराष्ट्रातील अशाच काही किल्ल्यांबाबत ज्यांनी स्वराज्य स्थापनेत मोलाचे योगदान दिले. 2 / 10छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा. या किल्ल्याचे बांधकाम सुरु असताना छत्रपतींना प्रचंड धन सापडले होते. त्या धनाचा उपयोग पुढे स्वराज्यासाठी करण्यात आला. कसे जाल - तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्यात आहे. पुण्यापासून वेल्ह्याला जाण्यासाठी बसेसची सोय आहे.3 / 10किल्ले प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासातील एक सुवर्णपान. शाहीर तुळशीदास यांनी वर्णन केल्याप्रमाणे ‘राजगड राजाचा, प्रतापगड जिजाईचा!’ राजमाता जिजाबाईंचा सर्वांत आवडता किल्ला म्हणजे प्रतापगड. स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध महाराजांनी याच प्रतापगडाच्या पायथ्याशी केला. कसे जाल - प्रतापगड हा सातारा जिल्ह्यात असून पुण्यापासून 137 कि. मी. अंतरावर आहे. पुण्याहून बसेसची सोय आहे. 4 / 10स्वराज्यातील झुंझार मावळा तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची बाजी लावत इ. स. 1670 मध्ये हा किल्ला स्वराज्यात दाखल केला होता. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजीबद्दल 'गड आला पण सिंह गेला' असे उद्गार काढले होते. सिंहगडाचे पूर्वीचे नाव ‘कोंढाणा’ होते. मात्र तानाजीनी दिलेल्या बलिदानानंतर हा गड सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. कसे जाल - पुणे शहराच्या अगदी जवळ हा किल्ला असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. पुण्याहून जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. 5 / 10कोकणातील समुद्र किनार्यावरचा मजबूत आणि बलाढ्य जलदुर्ग म्हणून 'मुरुड -जंजिरा' ओळखला जातो. चहुबाजुंनी पाणी असलेला हा किल्ला वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, नाना फडणीस यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु हा किल्ला ते जिंकू शकले नाहीत. हा किल्ला शेवटपर्यंत सिद्दींच्याच ताब्यात राहिला. कसे जाल - रायगड जिल्ह्यातील हा जलदुर्ग अलिबागपासून सुमारे 45 कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. 6 / 10कोल्हापूर जिल्ह्यात असलेला पन्हाळा हा शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांपैकी महत्त्वपूर्ण किल्ला. महाराजांनी इ. स. १६५९ रोजी हा किल्ला जिंकला. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून महाराज मोजक्या सहकार्यांबरोबर बाहेर पडून पन्हाळ्याहून सुखरूप विशाळगडावर पोहोचले होते. कसे जाल - कोल्हापूर शहरापासून 20 कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. जवळच जोतिबाचे मंदिर म्हणजेच जोतिबाचा डोंगर आहे. कोल्हापूरहून काही प्रायवेट गाड्या आणि बसेसची सोय आहे. 7 / 10शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे या किल्ल्याला स्वराज्यामध्ये एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. गडावरील शिवाई देवीच्या नावावरूनच जिजाऊनी छत्रपतींचं नाव 'शिवाजी' असं ठेवलं असं म्हटलं जातं. कसे जाल - शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून पुण्याहून 94 कि. मी. एवढ्या अंतरावर आहे. 8 / 10मुरुड-जंजिरा स्वराज्यात आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या शेजारी अजिंक्य असा जलदुर्ग बांधला तो म्हणजेच सिंधुदुर्ग. कसे जाल - किल्ल्यात जाण्यासाठी मालवणहून बोटीच्या साहाय्याने जाता येते. 9 / 10विजयदुर्ग म्हणजे स्वराज्यातील एक महत्त्वपूर्ण जलदुर्ग. या किल्ल्याला तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. कसे जाल - विजयदुर्ग हे मुंबई पासून 485 किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून 455 किमी अंतरावर आहे. मुंबई व पुण्यावरून विजयदुर्ग इथे थेट जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय आहे. 10 / 10'रायगड' हा शिवकालातील महत्त्वपूर्ण किल्ला होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६४ मध्ये हा गड बांधून घेतला. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड! कसे जाल - महाडपासून २७ कि. मी. अंतरावर असणार्या रायगडावर जाण्यासाठी महाडपासून गाड्यांची सोय आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications