-अमृता कदमफिरायला जायचं म्हणजे केवळ मौजमजा नाही..,अनेकजण आपले छंद जोपासण्यासाठी, आपल्या अभ्यासाच्या निमित्तानेही पर्यटन करत असतात. त्यामागे त्यांचा उद्देश एखाद्या ठराविक ठिकाणावर किंवा तिथल्या वैशिष्ट्यांवरच भर देण्याचा असतो. म्हणजे काहीजण वन्यजीवांचे छायाचित्रण करण्यासाठी, काहीजण पक्षीनिरीक्षणासाठी तर कोणी ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासाठीही आवर्जून पर्यटन करतात.दृश्य माध्यमांची आवड असलेले लोक जगभरात भरणाऱ्या विविध प्रदर्शनांना, महोत्सवांना हजेरी लावतात. दृश्य माध्यमांमधलाच एक प्रकार म्हणजे स्ट्रीट आर्ट. शहरांमधल्या रस्त्यालगतच्या मोठमोठ्या भिंतींचाच कॅनव्हास करून चित्रं काढली जातात. मान्यवर आर्टिस्टही आपल्या कुंचल्यातून या भिंतींना एक नवं रूप देतात.केवळ स्ट्रीट आर्टचा आस्वाद घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी जगभर फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. या स्ट्रीट आर्ट प्रेमींना जगभरातल्या शहरांमधल्या स्ट्रीट आर्टची माहिती देण्यासाठी ‘लोनली प्लॅनेट’ या ट्रॅव्हल मॅगझनिनं स्ट्रीट आर्ट वर एक पुस्तकच प्रकाशित केलं आहे. या पुस्तकामध्ये 42 शहरांमधल्या स्ट्रीट आर्टसाठी प्रसिद्ध असलेल्या 140 स्थळांची माहिती दिली आहे. लंडनपासून मेलबर्न, मॉन्ट्रियाल, सॅन फ्रॅन्सिस्कोपर्यंतची शहर या यादीत सामील आहेत. हे पुस्तक केवळ ठिकाणांची यादी देऊन थांबत नाही, तर यामध्ये काही प्रमुख कलाकारांचा परिचय, स्ट्रीट आर्टशी संबंधित महोत्सव, त्या महोत्सवांची ठिकाणं यांचाही समावेश पुस्तकामध्ये केलेला आहे. स्वत: क्युरेटर आणि प्रदर्शनं आणि शो आयोजित करणाऱ्या ‘द फ्युचर टेन्स’चे संस्थापक असलेल्या एड बार्टलेट यांनी ‘स्ट्रीट आर्ट’ चे संपादन केलं आहे.त्यांच्या मते हे पुस्तक स्ट्रीट आर्टचा अनुभव घेण्याच्या तुमच्या प्रवासात स्टार्टिंग पॉइंटचं काम करतं. त्यातून तुम्हाला महत्त्वाची शहरं, त्या शहरांमध्ये स्ट्रीट आर्टमध्ये नेमकं पाहण्यासाठी काय आहे, काही प्रमुख चित्रकारांनी केलेल्या कामाचा समावेश आहे. त्यामुळे एकदम नेमकेपणाने ट्रीपचं प्लॅनिंग करता येऊ शकतं. लंडनमधल्या शहरी आयुष्याचा अनुभव स्ट्रीट आर्टच्या चष्म्यातून घ्यायचा असेल, तर नेमकी लंडनमधल्या कुठल्या गल्ल्यांमधून सुरु वात करावी, लॉस एंजलिस मधला बेल्जियन कलाकार फडअचा स्ट्रीट आर्टवरचा ठसा, मेलबर्न शहरातल्या कलाकारांचं काम अशा अनेक गोष्टी या पुस्तकात येतात, ज्या रसिकांना त्या कलाकृतीचा अनुभव आणि आस्वाद घेण्यास मदत करु शकतात.तुमच्या पर्यटनाचा उद्देश जर त्या त्या शहरांमधल्या वास्तू, कलांचा अभ्यास करण्याचा असेल, त्यातून तुम्हाला आनंद मिळत असेल तर ‘स्ट्रीट आर्ट’ तुमच्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल. आणि अगदी लगेच फिरायला जाण्याचा विचार नसेल तर किमान एक चांगल पुस्तक वाचून अप्रत्यक्ष पर्यटनानुभव तर नक्कीच मिळेल.