शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाजपचा गड भेदण्यासाठी समाजवादी पक्षानं दिली अभिनेत्रीला संधी; कोण आहे काजल निषाद?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 9:31 PM

1 / 10
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत ३० जानेवारी २०२४ रोजी समाजवादी पक्षाने १६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत डिंपल यादव, अवधेश प्रसाद, अनु टंडन, रामप्रसाद चौधरी ते काजल निषाद यांच्या नावांचा समावेश आहे. पण काजल निषाद असे नाव आहे ज्यावर लोकांच्या नजरा खिळल्या आहेत.
2 / 10
कारण यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमधून सपाने त्यांना उमेदवारी दिली आहे. मनोरंजन विश्वातून आलेली काजल निषाद कोण आहे? तिचा चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीशी काही संबंध आहे का? आणि तिची राजकीय इंनिग काय आहे? याबाबत आपण जाणून घेऊया.
3 / 10
दीर्घकाळ टीव्ही मालिका आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर काजल आता राजकारणात आपले नशीब आजमावत आहे. अल्पावधीतच काजलनं समाजवादी पक्षात स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.
4 / 10
समाजवादी पक्षाने गोरखपूरमधून भोजपुरी अभिनेत्री काजल निषादला तिकीट दिले आहे. सपाने काजल निषादवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. याआधी पक्षाने तिला विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत संधी दिली आहे. काजल निषादचे लग्न गोरखपूरच्या भौवापर येथे राहणाऱ्या संजय निषादसोबत झाले आहे.संजय निषाद स्वतः भोजपुरी चित्रपटांचे निर्माते आहेत.
5 / 10
समाजवादी पक्षात येण्यापूर्वी काजल निषाद २०१२ पासून काँग्रेसमध्ये सक्रिय राजकारण करत होत्या. पण, २०२१ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि समाजवादी पक्षाचे सदस्यत्व घेतले. अखिलेश यादव गोरखपूर दौऱ्यावर गेले असता ते काजल निषाद यांच्या घरीही पोहोचले. त्यावेळी काजलने सोशल मीडियावर म्हटले होते की, माझ्या घरी राम आला आहे. यानंतर पक्ष लवकरच काजल निषाद यांच्याकडे मोठी जबाबदारी देणार असल्याची अटकळ बांधली जात होती.
6 / 10
काजल निषादने भोजपुरी सिनेमात मोठ्या प्रमाणात काम केले आहे. येथे तिने अनेक मोठ्या पडद्यावरील चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. इतकेच नाही तर काजलने प्रसिद्ध टीव्ही सीरियल लापता गंजमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिनयासोबतच त्या राजकारणातही सतत सक्रिय होत्या.
7 / 10
काजल एकदा काँग्रेसच्या तिकिटावर आणि दुसऱ्यांदा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाली आहे. असे असतानाही समाजवादी पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. आणि गोरखपूर या लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली आहे.
8 / 10
काजल निषादचा जन्म गुजरातमधील कच्छ येथे झाला. पण करिअरसाठी ती मुंबईत आली आणि इथे चित्रपट, शोमध्ये काम केलं. २००९ मध्ये तिने 'लापतागंज' शोमध्ये 'चमेली' या भूमिकेतून करिअरला सुरुवात केली. यानंतर भोजपुरी चित्रपटसृष्टीतील तिचा पहिला चित्रपट 'शादी ब्याह' होता.
9 / 10
रवी किशन हे भोजपुरी, हिंदी चित्रपट अभिनेता पासून यशस्वी नेते बनले आहे. २०१४ साली त्यांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१७ मध्ये रवी किशन यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. रवी किशन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.
10 / 10
गोरखपूर लोकसभा मतदारसंघ हा गोरखनाथ मठाचा बालेकिल्ला आहे, ज्यावर योगी आदित्यनाथ सलग पाच वेळा एकतर्फी विजयी झाले आहेत. मात्र, भाजपा पुन्हा एकदा रविकिशन यांना गोरखपूरमधून उमेदवारी दिली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ