वर्धा, दि. 21 - गर्भवती आणि स्तनदा मातांकरिता शासनाच्यावतीने पोषण आहार म्हणून शिरा पुरविण्यात येतो. सुदृढ आरोग्याकरिता असलेल्या या शि-यात अळ्या अन् सोंडे निघाल्याने खळबळ माजली आहे. पिपरी (मेघे) येथील अंगणवाडीतून दिलेले पाकिट एका गर्भवती महिलेने सोमवारी घरी उघडले असता हा प्रकार समोर आला. अळ्या आणि सोंडेयुक्त पोषण आहारातून महिलांचे आरोग्य सुधारले जाईल अथवा त्यांचे आरोग्य खालावेल याचा विचार होणे गरजेचे आहे. वर्धा शहरालगतच्या पिपरी (मेघे) भागातील अंगणवाडी केंद्रातून येथील एका गर्भवती महिलेला शिºयाचे पाकिट देण्यात आले. हे हवाबंद पाकिट उघडताच यातून रव्यासह अळ्या आणि सोंडे निघाल्याने मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे देण्यात आलेल्या शिºयाच्या पाकिटावर पॅकींग तारीख म्हणून जुलै २०१७ असे उल्लेखित आहे. सोबतच पॅकींग तारखेनंतर चार महिने हे उत्पादन खाण्यायोग्य असल्याचे म्हटले आहे. असे असताना आॅगस्ट महिन्यातच त्यातून अळ्या अन् सोंडे निघाल्याने शासनाच्या योजनेवर प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात शासनाच्यावतीने महिला व बालविकास विभाग आयुक्तालयाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनदामाता यांच्यासाठी पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. यावर शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे.याच निधीतून राज्यातील ग्रामीण आणि शहरी अंगणवाडीत पोषण आहार म्हणून शिरा, उपमा, सुकडी आदी पदार्थ हवाबंद पॅकेटमधून पुरविण्यात येत आहे. यात मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. यामुळे गर्भवती व स्तनदा मातांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा आहार महत्त्वाचा असल्याने त्याबाबत शासनाने गंभीर असने गरजेचे आहे. पोषण आहाराचा पुरवठा शासनस्तरावरून होतो. या संदर्भात महिलेने एकात्मिक बाल विकास प्रकल्प संचालकांकडे तक्रार करावी. या संदर्भात पाकिटाचे नमुने घेवून चौकशी करण्यात येईल. - विवेक इलमे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, तथा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी (प्रभारी), जि.प. वर्धा.