पिंपरी चिंचवड शहरात १ हजार ३५१ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी, नक्कल मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: December 8, 2023 03:29 PM2023-12-08T15:29:41+5:302023-12-08T15:31:33+5:30
राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील १९४८ ते १९६७ या आणि १९४८ पूर्वीच्या कालावधीतील दस्तऐवज व कागदपत्रांतील नोंदणी तपासण्यात आल्या....
पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेने १ लाख ३४ हजार ६०२ नोंदी तपासल्या असून, १,३५१ मराठा - कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील १९४८ ते १९६७ या आणि १९४८ पूर्वीच्या कालावधीतील दस्तऐवज व कागदपत्रांतील नोंदणी तपासण्यात आल्या.
शिक्षण, कर आकारणी व कर संकलन, वैद्यकीय व लेखा विभागांतील या कालावधीतील उपलब्ध दस्तऐवज, कागदपत्र व नोंदी तपासल्या आहेत. शिक्षण विभागातील सर्वाधिक १ लाख २० हजार ३८७ नोंदी तपासल्या. १९४८ ते १९६७ या कालावधीतील ७७ हजार ७२६ नोंदीची तपासणी केल्यानंतर १९८ मराठा - कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या.
१९४८ पूर्वीच्या कालावधीतील शिक्षण विभागातील ४२ हजार ६६१ नोंदी तपासल्या. त्यापैकी १,१५३ कुणबी नोंदी आढळल्या. महापालिकेने एकूण १ लाख ३४ हजार ६०२ नोंदी तपासल्या असून, १,३५१ कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. या कुणबी नोंदी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. ऑनलाइन नोंद दिसल्यानंतर नक्कल मिळण्यासाठी महापालिकेकडे लेखी अर्ज करावा लागणार आहे.