दि सेवा विकास बँकेत १० कोटी ३७ लाखांची बोगस कर्ज वाटप; तत्कालीन संचालकांसह २७ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 02:38 PM2021-08-13T14:38:04+5:302021-08-13T14:50:15+5:30
पिंपरीतील दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेत बोगस कर्जवाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पिंपरी चिंचवड : दि सेवा विकास बँकेतील १० कोटी ३७ लाख ३० हजारांची बोगस कर्जे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी, कर्जदार यांच्यासह अशा एकूण २७ जणांवर पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीतील दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेत बोगस कर्जवाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांनुसार २७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा गैरव्यवहाराचा प्रकार २०१६ ते ३१ मार्च २०१९ कालावधीत घडला आहे. यात बँकेच्या तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांवर कर्जदाराची कर्ज परतफेड क्षमता न पाहता, तारण मालमत्ता विक्रीयोग्य व निर्वेध नसताना कर्ज रक्कम वितरित केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांना बँकेतील २३८ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पिंपरी पोलिसांनी ८ मार्च २०२१ ला अटक करण्यात आली होती. सिंधी व्यापाऱ्यांची बँक म्हणून सेवा विकास बँक ओळखली जाते. तिच्या शहराबाहेरही शाखा आहेत. मूलचंदानी हे मागील दहा वर्षांपासून विकास बँकेचे अध्यक्ष होते. जानेवारी महिन्यात त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचे स्थानिक भाजप नेत्यांशी संबंध आहेत. याच पक्षाच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते तसेच बडे फिल्मस्टार यांच्याबरोबरही त्यांचे फोटो आहेत.