पिंपरीत बेशिस्त वाहनचालकांकडून सव्वादहा लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 06:53 PM2020-02-19T18:53:07+5:302020-02-19T20:03:54+5:30
या चार प्रकारांमध्ये तीन हजार ४३६ खटले दाखल
पिंपरी : उद्योगनगरीत वाहतूक कोंडीची समस्या आहे. कोंडी सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याने या उपाययोजना कुचकामी ठरल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई बडगा उगारला आहे. दोन आठवड्यांत त्यांच्याकडून दहा लाख ३१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी वाहतूक विभाग सक्षम करण्यावर भर देण्यात आला. तसेच विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र बेशिस्त वाहनचालक त्याला जुमानत नसून सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सातत्याने वाहनांचा खोळंबा होणे, कोंडी होणे अशा समस्या कायम आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. मद्यपान करून वाहन चालवणे (ड्रंक अँड ड्राइव्ह), विरुद्ध दिशेने वाहन चालवणे (राँग साईड), वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगात वाहन चालवणे (ओव्हर स्पीड), वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणे (टेंटेड ग्लास) या चार प्रकारांमध्ये तीन हजार ४३६ खटले दाखल करून त्यामध्ये १० लाख ३१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या १९५ वाहन चालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. ही सर्व प्रकरणे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. चुकीच्या किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या एक हजार ३५८ वाहनचालकांवर कारवाई करत त्यांना एक लाख ३५ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या ६४२ जणांना सहा लाख ४७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म लावलेल्या एक हजार २४१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच काचांचे काळे फिल्मिंग काढण्यात आले. अशा वाहन चालकांना दोन लाख ४८ हजार २०० रुपयांचा दंड आकारला आहे.
बेशिस्त वाहनचालकांकडून सव्वादहा लाखांचा दंड वसूल (जोड)
बेशिस्त वाहनचालकांवर १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान केलेली कारवाई
नियमांचे उल्लंघन खटले दंड
ड्रंक अँड ड्राईव्ह १९५
राँग साईड १३५८ १३५८००
ओव्हर स्पीड ६४२ ६४७०००
टेंटेड ग्लास १२४१ २४८२००