‘मेट्रोझिप’मध्ये शंभरावी बस दाखल
By admin | Published: August 20, 2016 05:20 AM2016-08-20T05:20:19+5:302016-08-20T05:20:19+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीने हिंजवडी आयटी पार्क येथे मेट्रोझिप या वाहतूक व्यवस्थेत १००वी बस दाखल करण्यात
वाकड : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीने हिंजवडी आयटी पार्क येथे मेट्रोझिप या वाहतूक व्यवस्थेत १००वी बस दाखल करण्यात आली. या वाहतूक व्यवस्थेमुळे आयटीतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे. वाहतूककोंडी सुटण्यासदेखील मदत होत आहे.
सप्टेंबर २०१४ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर चार मार्गांवर १३ बस सुरू करण्यात आल्या होत्या. गेल्या दोन वर्षांत ही संख्या आता १०० वर पोहोचली आहे. सध्या ४४ मार्गांवर ही सुविधा सुरू असून, या बसच्या दिवसाला ३५० फेऱ्या होत आहेत. या बसचा पाच हजारांहून अधिक आयटी कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे. या बस पिंपरी-चिंचवडसह परिसरात विविध भागात जात आहेत. यासह वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मेट्रोझिप ग्रीन आणि मेट्रोझिप डिलाइट ही सेवादेखील सुरू करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सेवेचे उद्घाटन झाले. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पटवर्धन उपस्थित होते. (वार्ताहर)