पेरूची १०० झाडे विनापरवाना हलवली, महामेट्रोने केला प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 03:04 AM2018-06-14T03:04:23+5:302018-06-14T03:04:23+5:30

कृषी महाविद्यालयाच्या आवारातील पेरूची सुमारे १०० झाडे विनापरवाना काढण्यात आली. महापालिका व महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती याबाबत अंधारात आहेत.

100 trees moved unopposed | पेरूची १०० झाडे विनापरवाना हलवली, महामेट्रोने केला प्रकार

पेरूची १०० झाडे विनापरवाना हलवली, महामेट्रोने केला प्रकार

Next

- राजू इनामदार
पुणे : कृषी महाविद्यालयाच्या आवारातील पेरूची सुमारे १०० झाडे विनापरवाना काढण्यात आली. महापालिका व महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती याबाबत अंधारात आहेत. त्यांची परवानगी मागून वर्ष होऊन गेले तरीही काही होत नसल्यामुळे महामेट्रोने ही झाडे हलवली आहेत.
महामेट्रो कंपनीला पुणे मेट्रो च्या डेपोसाठी म्हणून कृषी महाविद्यालयाची जागा मिळाली आहे. जागेचे कायदेशीर हस्तांतरही झाले आहे. या जागेवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी झाडांची कलमे तसेच अन्य माहिती देण्यासाठी म्हणून पेरू, आंबा वगैरे फळझाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. सर्व झाडे पुर्ण वाढलेली व चांगला जातीची आहे. त्यापासून महाविद्यालयाला उत्पन्नही मिळत होते. आता मेट्रो च्या डेपोचे काम सुरू करण्यासाठी महामेट्रो ला ही संपुर्ण जागा सपाट करणे गरजेचे आहे. त्यासाठी तेथील सर्व झाडे तोडणे आवश्यक होते. ते लक्षात घेऊन महामेट्रो ने वर्षभरापुर्वीच महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे तसा प्रस्ताव दिला होता.
त्यात झाडे तोडणार नाही तर त्यांचे पुनर्रोपण करणार आहे, त्यासाठी परवानगी मिळावी असे म्हटले आहे. वर्षभरापुर्वी दिलेल्या या प्रस्तावावर वृक्ष प्राधिकरण समितीकडून काहीच कार्यवाही झालेली नाही. पावसाळा तोंडावर आल्यामुळे महामेट्रो ला डेपो चे काम लवकर सुरू करायचे होते. पाऊस झाला तर त्या जागेत जेसीबी किंवा अन्य आवश्यक यंत्रसामग्री पोहचवणे अशक्य झाले असते. त्यामुळे त्यांनी प्राधिकरणाच्या परवानगीची वाट न पाहता झाडे हलवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती मिळाली. आतापर्यंत पेरूची एकूण १०० झाडे हलवण्यात आली असून आता आंब्याचीही झाडे हलवण्यात येणार आहेत असे समजते. त्याची तयारी सुरू आहे.
दरम्यान ८ मे २०१८ रोजी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक झाली होती. त्यात महामेट्रो च्या अर्जावर चर्चा झाली. त्यामध्ये समितीच्या सदस्य शिल्पा भोसले यांनी महामेट्रो चा परवानगीचा अर्ज नियमांला धरून नसल्याचे निदर्शनास आणले. त्यावर तज्ज्ञाने केलेल्या पाहणीचा अहवाल नाही, झाडे कोणती, कोणत्या जातीची, कुठे लावणार, ती जागा, त्याचा तपशील याची काहीही माहिती नसल्याचे त्यांनी बैठकीतच स्पष्ट केले. त्याबैठकीच्या आधी समितीचे अध्यक्ष असलेल्या आयुक्त सौरव राव यांनी महामेट्रो चा अर्ज येऊन वर्ष झाले आहे व त्यांना आता परवानगी द्यावी लागेल असे स्पष्ट केले होते. तरीही सदस्यांनी वृक्ष आहेत त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर तशी पाहणी काही सदस्यांनी केलीही. मात्र त्यावर निर्णय अद्याप तरी झालेला नाही. कारण समितीची बैठकच झाली नाही. त्यामुळेच महामेट्रोने झाडे हलवण्याचा निर्णय घेतला.
 

वर्ष झाल्यानंतरही अधिकृत परवानगी मिळत नसेल तर महामेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पाने काय करायचे हा प्रश्न आहे. अशा प्रकल्पांची किंमत दररोज वाढत असते. त्यामुळे कामाला गती हवी असते. पावसाळ्यापुर्वी जागा सपाट करण्याचे नियोजन होते. त्यामुळे काम सुरू केले. यात एकही झाड तोडलेले नाही तर सर्व वृक्षांचे यशस्वी पुनर्रोपण केले आहे. त्याचीही परवानगी मागितली आहे, मात्र त्यांची बैठकच होत नसल्यामुळे परवानगी मिळालेली नाही.
- भानुदास माने, महामेट्रोसाठी वृक्ष पुनर्रोपणाचे काम करणारे अधिकारी
 

Web Title: 100 trees moved unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.