शहराला डेंगीचा विळखा, शहरात १०३ रुग्णांना लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:44 AM2018-10-06T01:44:16+5:302018-10-06T01:44:52+5:30
पिंपरी : शहरामध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मलेरिया, डेंगी या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्वाइन फ्लूने आतापर्यंत २८ रुग्ण दगावले असून, सुमारे १०३ जणांना डेंगीची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत तापाचे ६० हजार ६२० रुग्ण आढळले आहेत. डेंगीचे लागण झालेले १०३ रुग्ण, तर संशयित १ हजार २६१ रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. ठिकठिकाणची उघडी गटारे, उघड्या कचराकुंड्या व घाणीचे साम्राज्य यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी किटकजन्य आजारांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या आजारावर महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांमध्येही उपचार उपलब्ध आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष केले, तर हा आजार प्राणघातक ठरू शकतो. डेंगीची लागण झाल्यावर डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये या लक्षणांमध्ये वाढ होते. उच्च ताप, पुरळ आणि स्नायू यामध्ये तीव्र वेदना होतात. प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. अशा वेळी रक्तस्राव होण्याची शक्यता असते. रक्तस्राव झाल्यामुळे रक्तदाब वाढून श्वसनप्रक्रियेवर परिणाम होतो. ही शेवटची स्थिती मानली जाते. अशा परिस्थितीमध्ये तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. ताप आल्यानंतर लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. ताप जास्त दिवस अंगावर काढू नये. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. घराजवळ असलेल्या रिकाम्या भांड्यांमध्ये, कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
डेंगीचा आजार विषाणूजन्य
डेंगी हा विषाणूजन्य आजार आहे. त्याचा प्रसार एडिस या डासांमार्फत होतो. आजारी माणसाच्या रक्तातील डेंगी विषाणू इडिस जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसºया निरोगी व्यक्तीच्या शरीरात संक्रमित होतात. हे डास समुद्रसपाटीपासून सुमारे १००० मीटरपर्यंतच्या भागात जिवंत राहतो. इडिस हा एक लहान, काळा डास असून, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हा डास सकाळी व संध्याकाळी चावतो.
60,620
शहरात आतापर्यंत आढळलेले तापाचे रुग्ण
1,261
डेंगी संशयित
रुग्णांची संख्या
103
डेंगीची लागण
झालेले रुग्ण