मेट्रोचा १०४८ कोटींचा आराखडा; पिंपरी ते निगडी मार्गाला ‘स्थायी’ची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:50 AM2018-12-12T02:50:20+5:302018-12-12T02:50:39+5:30
पहिल्या टप्प्यात साडेचार किलोमीटरसाठी वाढीव २०५ कोटींचा खर्च
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वीकारल्याने महामेट्रो कंपनीने ‘पिंपरी ते निगडी’पर्यंत सुमारे साडेचार किलोमीटरचा (४.४ किमी) वाढीव मेट्रो मार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केला. सुमारे एक हजार ४८ कोटींच्या मूळ आराखड्यासह वाढीव २०० कोटींच्या खर्चाला स्थायी समितीने मंगळवारी (दि. ११) मान्यता दिली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर हा आराखडा राज्य व केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट या सुमारे १६ किलोमीटरच्या मार्गाचे काम सुरू आहे. परंतु, ही मेट्रो निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत पुढे नेण्याची मागणी पिंपरी-चिंचवडचे नागरिक व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांची आहे. या मागणीनुसार महापालिका आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे महामेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनीने निगडीपर्यंत मेट्रोचा आराखडा तयार केला. त्या डीपीआरचे मंगळवारी महापालिका स्थायी समितीपुढे सादरीकरण करण्यात आले. स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील ग्रेड सेपरेटरवर दापोडी हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. हे अंतर सुमारे आठ किलोमीटर आहे. यामध्ये वाढीव निगडी मेट्रो मार्गामुळे आणखी साडेचार किलोमीटरची भर पडणार आहे. त्यामुळे शहरातील दापोडी ते निगडी अशा दोन हद्दी मेट्रोने जोडल्या जाणार आहेत.
स्थायीला सादर केलेल्या प्रस्तावात या वाढीव मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी खर्च अपेक्षित धरला होता. त्यात स्थायीसमोरील सादरीकरणादरम्यान भूसंपादन व इतर कामांसाठी आणखी २०५ कोटी रुपयांचा खर्च वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे या मेट्रो प्रकल्पासाठी एकूण एक हजार २५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या वाढीव खर्चासह मेट्रोच्या डीपीआरला स्थायी समितीने मंजुरी दिली.
पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रोच्या नामकरणाचा ठराव
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांच्या मागणीनुसार स्थायी समितीने या मेट्रोचे पुणे मेट्रोऐवजी पुणे - पिंपरी-चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याचा ठराव उपसूचनेद्वारे केला आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी दिली.
निगडी मेट्रोचे फायदे
शहराला जोडणारा वेगवान मार्ग
पिंपरी ते निगडी वेळेची बचत
मेट्रो मार्गामुळे हवेचे प्रदूषण नाही
वाहतूककोंडीतून मुक्तता
रस्ता दुरुस्तीच्या खर्चात बचत
महामार्गावरील अपघात कमी
हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी परवानगी
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोमार्ग वाकडमध्ये महापालिकेच्या आताच्या व भविष्यात समाविष्ट होणाऱ्या भागातून जातो. तेथे मेट्रोचे काही खांब उभारण्यात येत आहेत. मेट्रोचे काम करण्यासाठी पीएमआरडीएला परवानगी देण्याच्या प्रस्तावाला ऐनवेळी स्थायीत मंजूर केला.
स्वारगेट ते पिंपरी मार्गाच्या पहिल्या टप्प्यातच ही निगडीपर्यंत मेट्रो केल्यास कोट्यवधी खर्चाची बचत होईल. शिवाय निगडी मेट्रोमुळे नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका होऊन औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
- तुषार शिंदे, मुख्य समन्वयक, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम