वाय प्लस दर्जाचे ११ सुरक्षारक्षक एस्काॅर्टमध्ये १० जण; चंद्रकांत पाटलांवर कवच भेदून शाईफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 01:16 PM2022-12-11T13:16:09+5:302022-12-11T13:17:01+5:30
पालकमंत्री असल्याने चंद्रकांत पाटील यांच्यासोबत स्थानिक पोलिसांची विशेष पथकेही होती
पिंपरी : मंत्र्यांना पोलिसांकडून विविध दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यादरम्यान वाय प्लस विथ एस्काॅर्ट सुरक्षा पुरविण्यात आली होती, असे असतानाही हे सुरक्षा कवच भेदून मंत्री पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या विधानाचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी (दि. १०) त्यांचा पिंपरी-चिंचवड दौरा आयोजित केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा विविध राजकीय पक्ष आणि विविध संघटनांकडून देण्यात आला होता. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खबरदारी घेत मोठा फौजफाटा उपलब्ध करून देत मंत्री पाटील यांच्या ताफ्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
चिंचवड येथील श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे शनिवारी सायंकाळी उद्घाटन करण्यासाठी मंत्री पाटील चिंचवड येथे आले. उद्घाटन सोहळ्यापूर्वी ते चिंचवड येथील भाजप पदाधिकाऱ्याकडे गेले. त्यावेळी तेथून बाहेर पडताना मंत्री पाटील यांच्यावर शाईफेक झाली. यावेळी पाटील यांच्या आजूबाजूला त्यांचे नियमित सुरक्षारक्षक तसेच पोलिस असे मोठे सुरक्षाकवच होते. तरीही आंदोलकांनी हे सुरक्षाकवच भेदून शाईफेक केली.
अचानक घडला प्रकार
मंत्री पाटील यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या विविध राजकीय तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी निगराणीत ठेवले होते. तसेच मंत्री पाटील यांच्यासोबत भाजप पदाधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. असे असतानाही हे सुरक्षाकवच भेदत आंदोलकांनी अचानक समोर येऊन मंत्री पाटील यांच्यावर शाईफेक केली. या प्रकारामुळे सर्वचजण गोंधळले. शाईफेक करणाऱ्याला पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेतले. तसेच इतर दोन जणांनी तेथे घोषणाबाजी केली. त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेतले.
...अशी होती सुरक्षाव्यवस्था
वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा पुरवण्यात आली होती. वाय प्लस दर्जामध्ये ११ सुरक्षारक्षक तसेच एस्काॅर्टमध्ये १० जणांचा समावेश होता. तसेच मंत्री पाटील यांच्या ताफ्यासाठी पायलट देखील देण्यात आले होते. या सुरक्षेतील कर्मचाऱ्यांच्या ताफ्याची दोन ते तीन वाहने असतात. तसेच पालकमंत्री असल्याने चंद्रकांत पाटील यांच्यासोबत स्थानिक पोलिसांची विशेष पथकेही होती.