रेल्वे स्थानक परिसरातील ११ पाकीटमार पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:36 PM2018-05-31T15:36:54+5:302018-05-31T15:36:54+5:30
निर्जनस्थळी रात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरटे ब्लेड कटर,चाकू, कात्री, मिरची पूड यांचा वापर करून नागरिकांची लुटमार करत असल्याच्या पोलिसांकडे तक्रारी येत होत्या.
रावेत : महिनाभरापासून आकुर्डी रेल्वे स्थानक व आजूबाजूच्या परिसरात पाकीटमारी करणाऱ्या ११ पाकिटमारांना पकडून आकुडीर्तील पोलीस तसेच पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते यांनी रेल्वे पोलिसांच्या स्वाधिन केले.
रेल्वे प्रवाशांचे खिसे कापणारे पाकिटमारांचे हे टोळके याच परिसरात वावरत होते. आकुर्डी हे त्यांचे आश्रयस्थान बनले होते. कासारवाडी, पिंपरी,भाटनगर,ताडीवाला रस्ता, चिंचवड विद्यानगर,घोरावाडी,लोणावळा,तळेगाव येथून येणारे काही चोरटे रेल्वे प्रवाशांची लुटमार करीत होते.निर्जनस्थळी रात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरटे ब्लेड कटर,चाकू, कात्री, मिरची पूड यांचा वापर करून नागरिकांची लुटमार करत असल्याच्या पोलिसांकडे तक्रारी येत होत्या. त्यामुळे नागरिक तसेच स्टेशन स्थानकाचे कर्मचारीसुद्धा हैराण झाले होते. कटर गँगचे लालिबाई,प्रियाबाई तसेच टकल्या आणि ढाकण्या हे चोरटे नेतृत्व करत आहेत. निझाम मोहम्मद शेख,अजय लक्ष्मण राठोड,अनिल सिसरन, राजू शेंडगे,विशाल संजय वाघमारे,दिपक अशोक महाडिक, समाधान पटेल, तेजस वाघमारे, मुकेश चव्हाण,दिनेश यादव, अशोक सोनवणे अशी पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या टोळक्यातील सदस्यांची नावे आहेत.
या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवक,पोलीस मित्रांनी आॅपरेशन कटर गँंग ही धडक मोहीम राबवली. ११ गुंडपाकीटमारांना शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या मोहिमेत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील,अर्चना घाळी, विद्या शिंदे, बाबासाहेब घाळी,अमृत महाजनी,अमोल कानु,अमित डांगे,संतोष चव्हाण,विशाल शेवाळे, देवजी सापारिया,जयेंद्र मकवाना,जयप्रकाश शिंदे,नितीन मांडवे, कपिल पवार यांनी सहभाग घेतला. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी संजय पाचपुते,आकुर्डी रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर राजेश कुमार,पॉइंट्समन दत्ता खाडे, खडकी रेल्वे आर. पी. एफ. विभागाचे पोलीस उपनिरीक्षक डी. एन. लाड, आर.पी.एफ. आणि जी.आर.पी.एफ. चे सहायक पोलिस उपनिरीक्षक तात्या करदाळे,भाऊ साळवे यांनीही सुरक्षा कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.