अवैध धंद्यांतील १२२ आरोपींना अटक; सव्वा लाखाची दारू, जुगार साहित्य जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 02:07 PM2020-01-28T14:07:41+5:302020-01-28T14:14:18+5:30
‘मटका किंग’, जुगार अड्ड्यावाल्यांचे धाबे दणाणले
पिंपरी : उद्योगनगरीतील अवैध धंद्यांवर कारवाई करून शहर भयमुक्त करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित केले. मात्र, त्यानंतरही अवैध धंदे व गुन्हेगारीत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. याबाबत 'स्टिंग ऑपरेशन व ‘अवैध धंद्यांचे आगार’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध करून ‘लोकमत’ने पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांना उजेडात आणले. त्यामुळे या धंद्यांवाल्यांचे धाबे दणाणले. पोलिसांनी १२२ आरोपींना अटक करून सव्वा लाखाच्या दारूसह जुगाराचे आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
........
उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिसांचा ‘इंडस्ट्रियल सेल’ स्थापन केला आहे. त्या माध्यमातून उद्योजकांशी चर्चा करण्यात येते. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास मदत होत आहे. परिणामी एमआयडीसीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यात यश आले आहे. फ्रेंच व जर्मन कौन्सलर यांनी पोलीस आयुक्तालयाला नुकतीच भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्याशी गुन्हेगारीबाबत चर्चा करण्यात आली. एमआयडीसीत गुन्हेगारांचा कोणताही त्रास नाही. येथील गुन्हेगारी रोखल्याबद्दल फ्रेंच व जर्मन कौन्सलर यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे, असे आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगितले.
................
स्टिंग आॅपरेशन’ करून ‘लोकमत’ने केला पर्दाफाश
४अवैध धंद्यांमुळे राज्यभरातील व देशभरातील गुन्हेगारांना शहरात आश्रय घेणे सहज शक्य होत आहे. त्यामुळे महिला, विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्यांसह शहराच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे. तसेच अनेक कुटुंबांची वाताहत हो असून, महिला व मुले रस्त्यावर येत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी अवैध धंद्यांना आळा घालणे आवश्यक आहे. पोलिसांनी याबाबत दक्ष राहून योग्य उपाययोजना करून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, असे असतानाही शहरात अवैध धंदे राजरोस सुरू असल्याचे दिसून येते. याबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून पर्दाफाश केला. त्याची धास्ती घेऊन काही अवैध धंदेवाल्यांनी गाशा गुंडाळला, तर काही शहरातून गायब होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच खडबडून जागे झालेल्या पोलीस यंत्रणेकडूनही अवैध धंद्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे.
.............
हुक्का पार्लरवर कारवाई
हिंजवडी पोलिसांनी हुक्का पार्लरवर कारवाई केली. यात चार हुक्का पॉट, चार हुक्का पार्लर पाईप, सहा हजारांचे हुक्का फ्लेवर बॉक्स असे एकूण १२ हजार ८०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. तर विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ९८ हजार ७५ रुपये किमतीचा तीन किलो ९७३ ग्रॅम गांजा तसेच रोख २२० रुपये व ५५ हजार रुपये किमतीची दुचाकी असा एक लाख ५३ हजार २९५ रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.
................
‘भयमुक्त शहर’ या संकल्पनेनुसार पोलिसांकडून काम सुरू आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणताही सामान्य नागरिक कितीही वाजता, कोणत्याही भागात वावर करू शकतो. अत्याचार, गंभीर गुन्हे, लूटमार तसेच सोनसाखळी चोरीचे प्रकार रोखण्यात यश आल्याने महिलाही सुरक्षित आहेत. हीच ‘भयमुक्त शहर’ संकल्पना आहे.- संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.
.......