कर्करोगग्रस्तांसाठी केले केस दान, चिंचवडमधील १३ वर्षीय आदिती जैनचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 02:15 AM2018-09-27T02:15:23+5:302018-09-27T02:15:39+5:30
काळेभोर लांब केस हे महिलांचे मुख्य आकर्षण, पण हे केस जेव्हा कर्करोगग्रस्तांसाठी उपयोगी ठरत असल्याचे समजल्यावर ते कापून दान करण्याचे धाडस चिंचवडमधील तेरा वर्षीय आदिती जैन हिने केले आहे.
चिंचवड - काळेभोर लांब केस हे महिलांचे मुख्य आकर्षण, पण हे केस जेव्हा कर्करोगग्रस्तांसाठी उपयोगी ठरत असल्याचे समजल्यावर ते कापून दान करण्याचे धाडस चिंचवडमधील तेरा वर्षीय आदिती जैन हिने केले आहे. कर्करोगग्रस्तांसाठी काम करणाऱ्या मुंबईतील ‘मदत चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेला तिने स्वत:चे केस कापून दान केले आहेत. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.
चिंचवडमधील हे जैन कुटुंबीय जैन सोशल ग्रुप पिंपरी-चिंचवडच्या माध्यमातून नेहमीच कार्यरत असतात. मृत्यू पश्चात अवयवदानाची मोहीम सध्या जैन सोशल ग्रुपकडून केली जात आहे. याच कार्यातून दानाची महती मिळालेल्या आदितीने कर्करोगग्रस्त महिलांसाठी केस दान करण्याचा मनोदय आपल्या आईवडिलांना बोलून दाखविला. पाचवीत शिक्षण घेणारी आदिती आई-वडिलांसोबत एका कर्करोगग्रस्त महिला नातेवाइकांना भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा उपचार घेणाºया महिलेला केस नसल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने पालकांना विचारले असता अशा रुग्णांना या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे तिच्या लक्षात आले. अशा महिलांना कोणी केसदान केले, तर मुंबईमधील संस्था या केसांचे टोप बनवून कर्करोग महिलांना देत असल्याचे तिला समजले. तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न करता स्वत:चे केस या संस्थेला दान करण्याची इच्छा पालकांकडे व्यक्त केली.
आदितीची आई अपर्णा जैन यांनी याबाबत आदितीच्या वडिलांना सांगितले. तिचे वडील जितेंद्र जैन यांनी मुलीच्या या निर्णयाचे स्वागत करून मुंबईतील ‘मदत चॅरिटीबल ट्रस्ट’ या संस्थेशी संपर्क साधत त्यांनी मुलीची इच्छा सांगितली.
लहानपणीच समाजसेवेची शिकवण
कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारादरम्यान त्यांना केस गमविण्याची वेळ येते. त्यांना पुन्हा केस येत नाहीत, अशा घटनेत त्यांना केसांचा टोप बसवावा लागतो. यासाठी काम करणाºया संस्थेला समाजातून सहकार्य मिळणे गरजेचे असल्याचे जैन कुटुंबीय सांगत आहेत. मुलांमध्ये लहान वयातच सामाजिक कार्य करण्याचे विचार रुजावेत ही खरी काळाची गरज आहे. जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून नेत्रदान, अवयवदान, श्रमदान व शैक्षणिक दानाचे कार्य केले जाते. या कार्याची शिकवण मुलांमध्ये रुजत असल्याचे जैन कुटुंबीय सांगत आहेत.मुंबईतील ‘मदत चॅरिटीबल ट्रस्ट’ या संस्थेशी संपर्क साधत त्यांनी मुलीची इच्छा सांगितली. आदितीने लगेच आपले केस कापून संस्थेकडे पाठविले. आदितीने केलेल्या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.