Video: पिंपरीत इमारतीचा स्लॅब कोसळला; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १५ वर्षांच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 12:48 PM2021-08-28T12:48:09+5:302021-08-28T15:00:36+5:30

जिवाचा आकांत अन् गर्दीचा न थांबणारा गलका...  मातीच्या ढिगाऱ्यातून मुलीला काढण्यासाठी अडीच तास बचावकार्य

13-year-old girl rescued after slab collapse in Pimpri | Video: पिंपरीत इमारतीचा स्लॅब कोसळला; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १५ वर्षांच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश

Video: पिंपरीत इमारतीचा स्लॅब कोसळला; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १५ वर्षांच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश

Next

पिंपरी : जिर्ण झालेल्या इमारतीचा काही भाग कोसळून १५ वर्षीय मुलगी ढिगाऱ्यात अडकली. तेथे हवा यावी म्हणून प्रयत्न करीत असतानाच मुलीला हिम्मत देण्याचे काम स्थानिकांनी केले. तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी देखील शर्थीचे प्रयत्न केले. अडीच तास मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने केव्हा गुदमरत होते तर केव्हा आता सारे संपले, असे वाटून जिवाचा आकांत सुरू होता. ढिगाऱ्यात अडकलेल्या मुलीची मदतीची याचना अन् गर्दीचा न थांबणारा गलका... यामुळे फुगेवाडीत यंत्रणेची पळापळ सुरू होती. तब्बल अडीच तास बचावकार्य सुरू ठेवत मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

पौर्णिमा उर्फ आशु संभाजी मडके (वय १५), असे ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढलेल्या मुलीचे नाव आहे. तिची आई आई मनीषा (वय ३५), बहीण निशी (वय ६) यांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले. पौर्णिमाचे वडील संभाजी मडके (वय ४३) हे एका खासगी संस्थेत नोकरीला आहेत. फुगेवाडी येथे स्टार स्पोर्ट्स क्लब चौकात अक्षय अशोक देवकर यांच्या मालकीचे जुने घर आहे. या घराच्या पहिल्या मजल्यावर मडके कुटुंब गेल्या बारा वर्षांपासून भाडेतत्वावर राहण्यास आहेत. माती, विटा व लाकडाचा वापर करून बांधलेल्या या घराची इमारत जिर्ण झाली आहे. 

संभाजी मडके हे शनिवारी (दि. २८) सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्यानंतर मनीषा मडके व निशी या दोघीही घराच्या खाली थांबल्या असताना साडेनऊच्या सुमारास पौर्णिमा पहिल्या मजल्यावर आंघोळ करीत होती. त्यावेळी पहिल्या मजल्याचा काही कोसळला. त्यामुळे पौर्णिमा ही खाली पडून ढिगाऱ्यात अडकली. या आवाजाने घराजवळील भीमराव चौधरी यांनी तेथे धाव घेत मनीषा आणि त्यांची मुलगी निशी हिला त्वरित बाहेर काढले. सुदैवाने ते ढिगाऱ्याखाली अडकले नाहीत. त्यानंतर तेथे आरडाओरडा झाला. त्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पौर्णिमा ढिगाऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिच्या बचावासाठी प्रयत्न सुरू झाले. 

पौर्णिमा घरात अडकली असल्याची माहिती स्टार स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष मयूर पुंडे यांना मिळाली. त्यांनी घरात जाऊन ढिगाऱ्याची माती, फरशी हटवून पौर्णिमाच्या बचावासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान अग्निशामक दल तसेच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू झाले. मात्र घर जुणे असल्याने घराचा काही भाग कोसळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बचावकार्यात अडथळे आले. दरम्यान पौर्णिमा घाबरलेल्या अवस्थेत होती. हवा नसल्याने तेथे गुदमरत होते. मयूर पुंडे यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. घराचा काही भाग पुन्हा कोसळत असल्याने आता सर्व संपले, आपणही ढिगाऱ्यात अडकणार, असे पुंडे यांना वाटले. मात्र तरीही त्यांनी धीर सोडला नाही. पौर्णिमालाही हिंमत दिली. 

दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी घरात प्रवेश करून मयूर पुंडे व स्थानिकांच्या मदतीने दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पौर्णिमाला सुखरूप बाहेर काढले. या वेळी नागरिकांनी टाळ्या वाजवून बचावकार्य करणाऱ्यांचे कौतुक केले. तसेच पौर्णिमाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गल्लीबोळामुळे मदतकार्यात अडथळे
फुगेवाडीतील दाट वस्तीत ही घटना घडली. गल्लीबोळातील अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामक दलाचा बंद किंवा इतर चारचाकी वाहन थेट घटनास्थळापर्यंत पोहचू शकले नाही. त्यामुळे मदतकार्य करण्यात अडथळे येत होते. तरीही पिंपरी-चिंचवड महापालकेच्या अग्निशामक दलाचे जवान, स्थानिक नागरिक, एनडीआरएफ यासह इतरांनी शर्थीचे प्रयत्न करून बचावकार्य केले. 

संसार झाला उध्वस्त
घर कोसळल्याच्या घटनेमुळे मडके कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. त्यांचा संसार उध्वस्त झाला आहे. सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही. आता ते घर राहण्यायोग्य नाही, असे स्थानिकांनी सांगितले.

Web Title: 13-year-old girl rescued after slab collapse in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.