पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचे 14 रुग्ण; तीन वर्षांनंतर आढळले रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 07:39 PM2022-08-05T19:39:33+5:302022-08-05T19:40:29+5:30
दोन वर्षांत गेला होता ९५ जणांचा बळी....
- प्रकाश गायकर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये शहरामध्ये १४ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. तर दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह वैद्यकीय विभागाचीही चिंता वाढली आहे.
शहरामध्ये २०१९ साली १९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यावेळी स्वाइन फ्लूची लस आणि टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात येत होते. त्यामुळे स्वाइन फ्लू आटोक्यात आला होता. मात्र आता पुन्हा त्याने डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. शहरामध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून थंडी-तापांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जुलै महिन्यामध्ये ५०३ डेंग्यूचे संशयित आढळले आहेत. तर ३७ जणांना डेंग्यू झाला आहे.
चिकनगुनियाचे पाच संशयित तर ९२७१ जणांना मलेरिया सदृ्श आजार होता. साथीचे हे आजार वाढलेले असताना आता त्यामध्ये स्वाइन फ्लूची देखील भर पडली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये १४ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. तर १८ जण संशयित आहे.
शुक्रवारी (दि. ५) एका दिवसामध्ये ३३१९ रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी तीव्र थंडी-तापाचे ४१२ रुग्ण रुग्णालयामध्ये भरती झाले आहे. त्यापैकी ६ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गेल्या आठ दिवसांमध्ये दोन संशयित रुग्णांचा बळी गेला आहे. त्यांचा मृ्त्यू स्वाइन फ्लूमुळे झाला आहे का? याबाबत प्रशासन पडताळणी करत आहे.
दोन वर्षांत गेला होता ९५ जणांचा बळी
पिंपरी चिंचवड शहरामध्ये २०१७ व २०१८ या दोन वर्षांमध्ये स्वाइन फ्लूने कहर केला होता. २०१७ मध्ये तब्बल ४१३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. तर ६१ जणांचा मृत्यू झाला. तसेच २०१८ मध्ये २४३ जण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यापैकी ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.