पिंपरी-चिंचवड शहरातील १४ पोलीस कोरोना ‘पाॅझिटिव्ह’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 09:52 PM2022-01-08T21:52:45+5:302022-01-08T21:53:05+5:30
कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असतानाच पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. शहरातील सात अधिकारी व सात कर्मचारी, अशा एकूण १४ पोलिसांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असतानाच पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. शहरातील सात अधिकारी व सात कर्मचारी, अशा एकूण १४ पोलिसांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर लाॅकडाऊन करण्यात आला. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये पोलिसांनी कोरोनाला शहर दलात एन्ट्री करण्यापासून रोखले. मात्र १५ मे २०२० रोजी शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनाही मोठ्या संख्येने कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला. त्यामुळे पोलिसांसाठी आयुक्तालयस्तरावर कोरोना सेल उभारण्यात आला. या सेलच्या माध्यमातून उपचाराच्या सुविधा, औषधोपचार उपबल्ध करून देत पोलिसांचे मनोबल उंचावण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी कोरोनावर मात केली.
शहरातील ९४६ पोलिसांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातील ९४२ पोलिसांनी कोरोनावर मात केली. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील एकाही पोलिसाला कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. मात्र आठवड्याभरापासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्यावर गेली. यात पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली.
हिंजवडी पोलीस ठाण्यातील पाच अधिकाऱ्यांना संसर्ग
कारोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका हिंजवडी पोलीस ठाण्याला बसला आहे. या पोलीस ठाण्यातील पाच अधिकारी कोरोना पाॅझिटिव आहेत. पोलीस आयुक्तालयांतर्गत सध्या बाधित असलेल्यांमध्ये महिला अधिकारीही आहेत. इतर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वरिष्ठांकडून करण्यात आले आहे.
शहर पोलीस दलातील मनुष्यबळ -
एकूण अधिकारी - ३४५
एकूण कर्मचारी - २९३०
आतापर्यंत कोरोनावर मात केलेले पोलीस -
अधिकारी - १३०
कर्मचारी - ७९८
सध्या कोरोना पाॅझिटव असलेले पोलीस -
अधिकारी - ७
कर्मचारी - ७