NDA Pune: कदम कदम बढायेजा...! एनडीएचा १४६ वा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात साजरा
By अविनाश रावसाहेब ढगे | Published: May 24, 2024 12:01 PM2024-05-24T12:01:14+5:302024-05-24T12:01:41+5:30
देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गेले तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३४० छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम पग’ ओलांडत, जल्लोष केला.
पिंपरी : डोळ्यात देशसेवेची स्वप्न घेऊन तीन वर्षांचे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे पेलण्याचा आत्मविश्वास... लष्करी बँड पथकाच्या कदम कदम बढायेजा... विजय भारत... सारे जहा से अच्छा या गाण्यांच्या तालावर शिस्तबद्ध संचलन अशा दिमाखदार वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४६ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शुक्रवारी (दि. २४) प्रबोधिनीच्या खेत्रपाल परेड मैदानावर पार पडला.
पहाटेच्या रम्य वातावरणात बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील ‘क्वाटर डेक’चा उघडलेला दरवाजा आणि या दरवाजातून विविध सुरावटींच्या तालावर संचलन करत खेत्रपाल मैदानावर लष्करी बॅण्डचे झालेले आगमन, त्यापाठोपाठ प्रबोधिनीच्या छात्रांच्या मैदानावर झालेल्या प्रवेशामुळे सर्वांना मंत्रमुग्ध आणि थक्क केले.
देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गेले तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३४० छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम पग’ ओलांडत, जल्लोष केला. या संचलनाला चेतक हेलिकॉप्टर आणि सुखोई या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी हे सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख अजयकुमार सिंग, मेजर जनरल संजीव डोगरा, वाईस ऍडमिरल अजय कोचर उपस्थित होते.
शोभित गुप्ताला सुवर्ण पदक...
यावर्षी राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी हा शोभित गुप्ता ठरला. तो तिन्ही वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणारा विद्यार्थी ठरला. तर मानिक तुरण हा विद्यार्थी राष्ट्रपती रौप्य पदकाचा मानकरी ठरला. तर अन्नी नैहर हा राष्ट्रपती कांस्य पदकाचा मानकरी ठरला.