गतिरोधकावरून दुचाकी उडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; निगडी भागातील घटना
By नारायण बडगुजर | Published: November 30, 2024 01:49 PM2024-11-30T13:49:34+5:302024-11-30T13:50:08+5:30
मुलाच्या डोक्याला, दोन्ही पायांना, हातांना, कंबरेला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता
पिंपरी : भरधाव दुचाकी गतिरोधकावरून उडाली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेला १५ वर्षीय मुलगा दुचाकीवरून खाली पडून डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला. यात त्याचा मृत्यू झाला. प्राधिकरण, निगडी येथे बिग इंडिया चौक ते भेळ चौकादरम्यान २७ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.
कृष्णा रामआसरे गुप्ता (१५, रा. अष्टविनायक चौक, मोरे वस्ती, चिखली), असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिस हवालदार टी. एस. वालकोळी यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २९) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा गुप्ता आणि त्याचा भाऊ सुरज रामआसरे गुप्ता (वय २०) हे दुचाकीवरून जात होते. कृष्णा हा दुचाकीवर पाठीमागे बसला होता. त्यावेळी प्राधिकरणात बिग इंडिया चौक ते भेळ चौकादरम्यान फुलाच्या दुकानासमोर गतिरोधकावरून दुचाकी उडाली. दुचाकीवर पाठीमागे बसलेला कृष्णा हा दुचाकीवरून खाली पडला. त्याच्या डोक्याला, दोन्ही पायांना, हातांना, कमरेला, गुप्तभागाला मार लागल्याने कृष्णा गंभीर जखमी झाला. यात त्याचा मृत्यू झाला.