आवास योजनेत दीडशे कोटींचा भ्रष्टाचार- शिवाजीराव आढळराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:33 AM2018-08-24T03:33:22+5:302018-08-24T03:34:03+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपाचा भ्रष्टाचार अधिक वेगात सुरू आहे, अशी टीकाही आढळराव पाटील यांनी केली.
पिंपरी : महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या रावेत, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, डुडुळगाव येथील पंतप्रधान आवास योजनेच्या निविदांची चौकशी करावी, त्यात सुमारे दीडशे कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा दावा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले आहे. पालिकेत होलसेल पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपाचा भ्रष्टाचार अधिक वेगात सुरू आहे, अशी टीकाही आढळराव पाटील यांनी केली.
पंतप्रधान आवास योजनेच्या कामावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी टीका केली. या वेळी जिल्हाप्रमुख राम गावडे, शहर महिला संघटक सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट उपस्थित होते.
कासारवाडी ते नाशिक मार्गाचे काम रखडले आहे़ त्यास राज्यकर्त्यांबरोबरच महापालिकाही जबाबदार आहे. नियोजन नसल्याने विकासकामांवर परिणाम होत आहे. परिणामी महामार्गाचे हजार कोटीचे काम दीडहजार कोटींवर जाणार आहे. पाचशे कोटींचा फटका बसणार आहे. औद्योगिक पट्ट्यातील गुंडगिरी, खंडणी खोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. पोलीस आयुक्त ही गुंडगिरी थांबवतील, अशी अपेक्षा आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.