‘बीव्हीजी’च्या संचालकास १६ कोटी रूपयांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 06:31 AM2019-07-20T06:31:50+5:302019-07-20T06:31:58+5:30
‘बीव्हीजी ग्रुप’चे संचालक हणमंतराव गायकवाड व त्यांच्या पत्नी यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
पिंपरी : ‘बीव्हीजी ग्रुप’चे संचालक हणमंतराव गायकवाड व त्यांच्या पत्नी यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. आकर्षक परताव्याच्या आमिषातून त्यांनी १६ कोटी ४५ लाख रुपये गुंतवणूक केली. मात्र, त्याचा न परतावा मिळाला ना संबंधित कंपनीचे समभाग!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद रामचंद्र जाधव व त्याची पत्नी सुवर्णा विनोद जाधव (रा. विमाननगर) या दाम्पत्याने त्यांच्या कंपनीतील गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ‘बीव्हीजी ग्रुप’चे संचालक गायकवाड यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
त्यानुसार गायकवाड दाम्पत्याने आरोपी जाधव यांच्या सावा मेडिको लिमिटेड कंपनी, अनघा फार्मा प्रा. लि., बायोडिल लॅबोरोटिज लि. या कंपन्यांमध्ये तब्बल १६ कोटी ४५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. यातील १२ कोटी ४५ लाख रुपयांची गुंतवणूक सावा मेडिको लिमिटेड कंपनीत केली. त्या मोबदल्यात त्यांना फक्त एक कोटी ५३ लाख ९५ हजार रुपयांचे समभाग मिळाले. मात्र गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा तसेच समभाग किंवा मूळ मुद्दल न देता फसवणूक केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.