आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यातून १७ लाख महसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 01:19 AM2019-03-17T01:19:01+5:302019-03-17T01:19:14+5:30

परदेशात जाऊन शिक्षण व स्वत:चे करिअर घडविणे आणि वास्तव्य करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तिथे वाहन चालवण्यासाठी लागणारा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

17 million revenues from international vehicle licenses | आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यातून १७ लाख महसूल

आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यातून १७ लाख महसूल

Next

- प्रकाश गायकर
पिंपरी - परदेशात जाऊन शिक्षण व स्वत:चे करिअर घडविणे आणि वास्तव्य करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तिथे वाहन चालवण्यासाठी लागणारा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) तीन वर्षांत १५९४ नागरिकांना वाहन परवाना दिला असून त्याद्वारे १७ लाखांचा महसूल जमा झाला आहे. आंतरराष्ट्रीय परवान्यातून परिवहन कार्यालयाला दर वर्षी पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळते.
परदेशामध्ये विविध ठिकाणी नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हा कालावधी सहा महिने ते पाच वर्षे असा असतो. परदेशात वाहन चालविण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे परवान्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येतात.
भारतीय नागरिकांकडे स्थानिक वाहनाचा परवाना असला तरी त्यांना विदेशात वाहन चालवण्यासाठी अडवले जाते. यासाठी आंतरराष्ट्रीय परवाना वेगळा काढावा लागतो. या परवान्याची वैधता एक वर्षाची असते. त्यानंतर नूतनीकरण आवश्यक असते. त्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाते. परवाण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी व नागरिकांचा वेळ वाचण्यासाठी आरटीओकडून आॅनलाइन सेवा उपलब्ध केली आहे.

पासपोर्टवर व्हिसाची नोंद आवश्यक
भारतातील वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या व्यक्तीस परदेशात वाहन चालविण्याचा परवाना मिळतो. ज्या कार्यालयातून परवाना काढलेला असेल, त्या कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. पासपोर्टवरील पत्ता व परवान्यावरील पत्ता सारखा असणे गरजेचे आहे. नसेल्यास आधी परवान्यावरील पत्ता पासपोर्टवरील पत्त्याशी जुळणारा करून घ्यावा. त्यासाठी पत्ता बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवाना मिळण्यासाठी पासपोर्टवर व्हिसाची नोंद आवश्यक आहे.

परदेशामध्ये अनेक नागरिक वास्तव्यास जात आहेत. तिथे गेल्यावर वाहन चालवण्यासाठी लागणारा परवाना आरटीओतून दिला जातो. आपल्या देशामधील वाहन चालविण्याचा परवाना तिकडे ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे परदेशामध्ये वेगळा परवाना अनिवार्य आहे. हा परवाना जगभरातील सर्वच देशांमध्ये चालतो.
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
 

Web Title: 17 million revenues from international vehicle licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.