पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताफ्यात १७ वाहने दाखल; पालकमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
By प्रकाश गायकर | Published: July 8, 2023 06:08 PM2023-07-08T18:08:52+5:302023-07-08T18:10:41+5:30
पोलीस आयुक्तालयास चारचाकी वाहनांची अनेक वर्षांपासून गरज भासत होती...
पिंपरी : शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी नवीन १७ चारचाकी वाहने पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात दाखल झाली. शहर पोलिसांची गस्त वाढण्यास यामुळे मदत मिळू शकेल. पोलीस आयुक्तालयात नवीन १७ वाहनांच्या ताफ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. ८) हिरवा झेंडा दाखविला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्तालयास चारचाकी वाहनांची अनेक वर्षांपासून गरज भासत होती. त्यामुळे आयुक्तांनी चारचाकी वाहने मिळावी यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीद्वारे पोलीस आयुक्तालयास मिळालेल्या निधीतून नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली. शहरातील पोलीस ठाण्यांना तसेच गुन्हे शाखेला या वाहनांचा उपयोग गस्तीसह तपास कामांसाठी होणार आहे. दाखल झालेल्या वाहनांमध्ये १३ नवीन बोलेरो निओ व ५ स्कॉर्पिओ वाहनांचा समावेश आहे.