भोसरीत १८ वाहनांची तोडफोड ; सोळा जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:05 PM2018-06-11T16:05:19+5:302018-06-11T16:05:19+5:30
पिंपरी-चिंचवडमध्ये टाेळक्यांकडून गाड्यांची ताेडफाेड करण्याचे सत्र अद्याप सुरु असून रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने भोसरीमधील गव्हाणे वस्ती येथे १६ जणांच्या टोळक्याने १८ वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांमध्ये १६ मोटारींचा समावेश आहे.
पिंपरी : दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने रात्री साडेबाराच्या सुमारास भोसरीमधील गव्हाणे वस्ती येथे १६ जणांच्या टोळक्याने १८ वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांमध्ये १६ मोटारींचा समावेश आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. अज्ञात १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हनुमंत कदम (वय ३३, रा. आदिनाथनगर, भोसरी) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कदम यांनी रामनगर हाऊसिंग सोसायटी जवळ सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला त्यांची मोटार नेहमीप्रमाणे उभी केली होती. मोटार उभी करून घराच्या दिशेने जात असताना अचानक ५ ते ६ दुचाकींवरून १६ जण आले. त्यांनी हातातील लाकडी दांडके आणि लोखंडी कोयत्याच्या साहायाने कदम यांच्या मोटारीची तोडफोड केली. तसेच परिसरातील १७ वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांमध्ये महागड्या मोटारींचा समावेश होता. परिसरात आरडाओरडा करून सर्वजण प्रभू रामचंद्र सभागृहाच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर कदम यांनी पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकारची माहिती दिली. माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पहाटे तीनच्या सुमारास ५ जणांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.