वाढदिवसालाच ‘बाळा’चा ‘कार’नामा..! अन् बचावासाठी धावले पोलिस ‘मामा’?

By नारायण बडगुजर | Published: May 30, 2024 09:58 PM2024-05-30T21:58:40+5:302024-05-30T21:58:54+5:30

थेरगाव येथील अपघात प्रकरणी दोन दिवसांनंतर गुन्हा दाखल

18 year old boy hit two cars on birthday, police filed complain after two days | वाढदिवसालाच ‘बाळा’चा ‘कार’नामा..! अन् बचावासाठी धावले पोलिस ‘मामा’?

वाढदिवसालाच ‘बाळा’चा ‘कार’नामा..! अन् बचावासाठी धावले पोलिस ‘मामा’?

पिंपरी: अठरावा वाढदिवस साजरा करत असलेल्या एका बाळाने भरधाव कार चालवून पार्किंग केलेल्या एका कारला धडक दिली. यात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर बाळाला आणि त्याच्याकडील कार मालकाना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, याप्रकरणी दोन दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. थेरगाव येथे मंगळवारी (दि. २८ मे) रात्री हा अपघात झाला.

दीपक लक्ष्मण दवणे (४३, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. ३०) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कार चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक यांची कार त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील कार भरधाव चालवून फिर्यादी दीपक यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. यात दीपक यांच्या कारसह चालकाकडील कारचेही मोठे नुकसान झाले.
 
पुण्यातील प्रकरणातून पोलिसांनी धडा घेतलाच नाही..

पुण्यातील कल्याणीनगर येथील अल्पवयीन मुलाने वाहन चालवून झालेल्या अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच थेरगाव येथे हा अपघात झाला. यात कोणीही जखमी किंवा कोणाचा मृत्यू झाला नसला तरी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी दोन दिवस लागले. पुण्यातील प्रकरणावरून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी धडा घेतलाच नाही, असे थेरगाव येथील अपघात प्रकरणावरून दिसून येते. 

कारचालक अल्पवयीन की सज्ञान?

कारचालक बाळाचा २८ मे रोजी अठरावा वाढदिसव होता. वाढदिवसालाच त्याच्याकडून अपघात झाला. त्यामुळे तो अल्पवयीन आहे की सज्ञान, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, पोलिसांकडून आधारकार्ड, जन्म दाखला यासह कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. 

कारमालकाला वाचविण्याचा प्रयत्न?

कारचालक मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना कारमालकाने त्याच्या ताब्यात कार दिली. त्यामुळे या कारमालकावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. मात्र, चौकशीकरून याबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. कारमालकाला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.   

डायल ११२ ला काॅल, पोलिस ठाण्यात नोंद नाही

अपघात झाल्यानंतर डायल ११२ या हेल्पलाइनवर काॅल करण्यात आला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी कारचालक तसेच कारमालक यांना पोलिस ठाण्यात आणले. मात्र, याबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नसल्याचे तसेच अपघात झाल्याचीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

पोलिसांचे हातावर हात...

कारचालक आणि कारमालकाला पोलिस ठाण्यात आणले असतानाही त्याबाबत पोलिस ठाण्यात नोंद केली नाही. तसेच अपघात झाला असल्याचीही नोंद न करता पोलिस ठाण्यातील अधिकारी हातावर हात धरून होते. याबाबत ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यावेळी ड्युटीवर असलेल्या संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणाचा दबाव होता का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.     

थरकाप उडवणारा अपघात

कारचालकाने भरधाव कार चालवून पार्किंग केलेल्या कारला धडक दिली. त्यामुळे मोठा आवाज झाला. त्यावेळी तेथे तरुणी, तरुण तसेच शतपावलीसाठी बाहेर पडलेले नागरिक रस्त्यावर होते. त्यांच्यासह परिसरातील नागरिकांचा अपघातामुळे व मोठ्या आवाजामुळे थरकाप उडाला. 

लोकमतचे प्रश्न

- कोणी जखमी नसले तरी अपघात झाला असल्याची नोंद पोलिसांनी का केली नाही?
- कारचालकास पोलिस ठाण्यात आणले असताना त्याने मद्यपान केले आहे किंवा नाही याबाबत वैद्यकीय तपासणी का केली नाही?
- गुन्हा दाखल करण्यासाठी दोन दिवस तक्रारदाराची प्रतीक्षा का केली?
- पोलिसांनी स्वत: गुन्हा दाखल का करून घेतला नाही?
- पोलिसांवर कोणाचा दबाव होता?

Web Title: 18 year old boy hit two cars on birthday, police filed complain after two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.