Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करत १९ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 03:13 PM2023-03-03T15:13:31+5:302023-03-03T15:15:01+5:30
आरोपीने फिर्यादीशी शादी डॉट कॉम या साईटवरून लग्नासाठी संपर्क केला...
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करत अत्याचार केला. तसेच आर्थिक अडचण असल्याचे सांगत महिलेला लोन काढण्यास सांगून तिच्याकडून तब्बल १९ लाख रुपये घेत फसवणूक केली. ही घटना सप्टेंबर २०२१ पासून ते १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत हिंजवडी परिसरात घडली. या प्रकरणी महिलेने बुधवारी (दि.१) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अमोल अशोकराव पिंपळे (वय ३३, रा. धानोरी, विश्रांतवाडी, मूळगाव - पळसखेडा पिंपळे, जालना) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीशी शादी डॉट कॉम या साईटवरून लग्नासाठी संपर्क केला. लग्नाचे आमिष दाखवत व्यवसायामध्ये अडचणी आल्याचे सांगून फिर्यादी यांना ॲपद्वारे लोन कसे घ्यायचे यांची माहिती देऊन फिर्यादी यांना लोन घेण्यास भाग पाडले. आणि हे पैसे मित्राच्या खात्यावरून फोन पे व गुगल पे द्वारे ट्रान्सफर करून घेतले. तसेच काही रक्कम रोख स्वरूपात घेऊन फिर्यादीची १९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. तसेच फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असे फिर्यादीत नमूद आहे.