Pune Crime | प्लॉट खरेदीच्या बहाण्याने दोन कोटी ७६ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 07:28 PM2022-11-26T19:28:52+5:302022-11-26T19:30:01+5:30
ही घटना नोव्हेंबर २०१७ ते १८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्राधिकरण निगडी येथे घडली...
पिंपरी : निगडी प्राधिकरणात दोन प्लॉट खरेदी करून देतो, असे भासवून पैसे घेऊन व्यावसायिकाची तब्बल दोन कोटी ७६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना नोव्हेंबर २०१७ ते १८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्राधिकरण निगडी येथे घडली. याप्रकरणी सोनित सोमनाथ परदेशी (वय ३८, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.२४) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी धर्मा सोनू गोल्हार (रा. प्राधिकरण, निगडी), मयत नरेंद्र रामचंद्र शेंगर यांच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: मृत नरेंद्र शेंगर यांनी फिर्यादींना सहा हजार स्क्वेअर फुटांचे दोन फ्लॅट घेऊन देतो, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपी धर्मा यांच्या बँक खात्यावर दोन कोटी ८१ लाख ५० हजार रुपये, तर महिला आरोपीच्या मीडिया आयडिया या फर्मच्या बँक अकाऊंटवर आठ लाख ५० हजार रुपये, असे एकूण दोन कोटी ९० लाख रुपये भरले. मात्र, आरोपींनी फिर्यादीला फ्लॅट घेऊन दिले नाहीत.
त्यामुळे फिर्यादीने वारंवार पैशाची मागणी केली असता, नरेंद्र यांनी केवळ १३ लाख ५० हजार रुपये दिले. परंतु आरोपींनी संगनमत करत राहिलेले पैसे परत न करता फिर्यादीची तब्बल दोन कोटी ७६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. पैशाची मागणी करणाऱ्या फिर्यादीला महिला आरोपीने पैसे परत मागितले तर आम्ही पोलिस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करू, अशी धमकी दिली.