पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीतून २ कोटींचे ‘एमडी’; पिंपरी-चिंचवड पोलीस दलात पुन्हा खळबळ
By नारायण बडगुजर | Published: March 5, 2024 05:07 PM2024-03-05T17:07:17+5:302024-03-05T17:07:52+5:30
एमडी विक्री प्रकरणात सहभागी पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई
पिंपरी : मेफेड्राेन (एमडी) हा अमली पदार्थ विक्रीप्रकरणी अटक केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या चारचाकी वाहनातून दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे ‘एमडी’ जप्त केले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात पुन्हा खळबळ उडाली. या उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
विकास शेळके (नेमणूक - निगडी पोलिस ठाणे), असे निलंबित केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. नमामी शंकर झा याला सांगवी परिसरात ‘एमडी ड्रग्स’ बाळगल्या प्रकरणी अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक विकास शेळके याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शेळके यालाही बेड्या ठोकल्या. या प्रकरणात पोलिसांनी ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपये किमतीचे ४४ किलो ७९० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले. त्यानंतर उपनिरीक्षक शेळके याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या गाडीमध्ये आणखी एमडी ड्रग्स ठेवले असल्याचे समोर आले. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने शेळके याच्या गाडीमधून दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे दोन कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्स जप्त केले.
पोलिस उपनिरीक्षक शेळके याने नमामी झा याला एमडी विक्रीबाबत सांगितले होते. त्यानुसार झा हा एमडी विक्रीसाठी सांगवी परिसरात गेला असता त्याला सांगवी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन किलो एमडी जप्त केले. त्यानंतर पुन्हा ४२ किलो एमडी जप्त केले. याप्रकरणी शेळके याला अटक केल्यानंतर त्याच्या गाडीतही एमडी ड्रग्स मिळून आले. आतापर्यंत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात ४७ किलो १९० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्स जप्त केले. एमडी विक्री प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक विकास शेळके याचा सहभाग आढळल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले.
उपनिरीक्षक शेळके याला अटक करून कसून चौकशी केली. त्याच्या गाडीत एमडी ड्रग्स असल्याचे तपासातून समोर आले. त्यानुसार दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे ड्रग्स गाडीतून जप्त केले. - वैभव शिंगारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी-चिंचवड