आयुक्तालयासाठी भाडे २ कोटी, महापालिकेतर्फे पोलिसांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:56 AM2018-08-18T00:56:14+5:302018-08-18T00:56:24+5:30

नव्याने सुरू झालेल्या पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी पालिकेच्या चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारत देण्यात आली. या इमारतीच्या भाड्यापोटी पोलिसांना पाच वर्षांकरिता दोन कोटी ३४ लाख पालिकेला द्यावे लागणार आहेत.

2 crores of rent for the Commissioner office, letter to police by municipal corporation | आयुक्तालयासाठी भाडे २ कोटी, महापालिकेतर्फे पोलिसांना पत्र

आयुक्तालयासाठी भाडे २ कोटी, महापालिकेतर्फे पोलिसांना पत्र

googlenewsNext

पिंपरी - नव्याने सुरू झालेल्या पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी पालिकेच्या चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारत देण्यात आली. या इमारतीच्या भाड्यापोटी पोलिसांना पाच वर्षांकरिता दोन कोटी ३४ लाख पालिकेला द्यावे लागणार आहेत.
स्वातंत्र्य दिनापासून पिंपरी-चिंचवडसाठी पोलीस आयुक्तालय तात्पुरत्या स्वरूपात चिंचवड येथील आॅटो क्लस्टरमधून सुरू झाले आहे. महात्मा फुले शाळेच्या इमारतीमध्ये फर्निचरसह स्थापत्य विषयक कामे सुरू आहेत.
आयुक्तालयाला मंत्रिमंडळाने मान्यता देण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्तालयाला मंजुरी मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रशस्त जागा शोधण्यास सुरुवात केली. त्यानुसार, महात्मा फुले शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयास योग्य असून, ती इमारत भाड्याने द्यावी, असे पत्र पोलिसांनी महापालिकेला दिले होते. त्यानुसार, या शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी भाड्याने देण्यास महापालिका सभेनेही मान्यता दिली.
पोलीस आयुक्तालयाची कामे महापालिकेच्या तीन इमारतीत करण्यात येणार आहेत. फुले शाळेच्या इमारतीत आयुक्तालयाचे काम होणार असून, निगडीतील कै. अंकुशराव बोºहाडे विद्यालय आणि चिंचवड आरक्षण क्रमांक दोनशे अकरामधील व्यापारी केंद्रातही इतर विभागांची कामे होणार आहेत. शाळेची इमारत प्रशस्त आहे. ग्राऊंड फ्लोअर, दोन मजले, भूखंडाचे क्षेत्रफळ एकूण चार हजार दोनशे चौरस मीटर आहे. तळमजला सातशे एक चौरस मीटर आहे. पहिला मजला सातशे
तीस तर दुसरा मजला सातशे बारा चौरस मीटर आहे. शाळेसमोरील मोकळ्या मैदानाचे क्षेत्रफळ साडेतीन हजार चौरस मीटर आहे. प्रत्येक मजल्यावर सात वर्ग खोल्या आणि एक सभागृह आहे. या इमारतीसाठी पालिकेने ५ वर्षांकरिता सव्वादोन कोटी रुपये भाडे आकारण्याचे निश्चित केले. या दराचा प्रस्ताव पोलिसांना पाठविला आहे.
महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, ‘‘फुलेच्या शाळेचे भाडे निश्चित केले आहेत. या इमारतीचे पाच वर्षांसाठी सव्वादोन कोटी रुपये भाडे आहे.’’

ग्रामीण व शहरी भागाचा समावेश : दोन परिमंडळात विभागणी

आयुक्तालयासाठी आर. के. पद्मनाभन यांची आयुक्तपदी तर मकरंद रानडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक झाली आहे. उपायुक्तपदी नम्रता पाटील, स्मार्तना पाटील व विनायक ढाकणे यांची नियुक्ती झाली आहे. यासह सहायक आयुक्तपदी चंद्रकांत अलसटवार आणि श्रीधर जाधव यांची नियुक्ती केली आहे. तीन उपायुक्त आणि सात सहायक आयुक्तांची पदे आहेत.
गुन्हे शाखेसाठी एक उपायुक्त आणि एक सहायक आयुक्त यांची नेमणूक केली जाणार आहे. परिमंडल एक अंतर्गत सहायक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग अखत्यारित देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी या ठाण्याचा समावेश असेल, तर सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभागांतर्गत पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, निगडी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
परिमंडल दोन अंतर्गत सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग अखत्यारित वाकड, हिंजवडी, सांगवी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. सहायक पोलीस आयुक्त चाकण विभागांतर्गत दिघी, चाकण, आळंदी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
स्मार्तना पाटील परिमंडल एकचे कामकाज पाहणार आहेत, तर उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे परिमंडल २ चा कारभार सोपविण्यात आला आहे. त्याचबरोबर गुन्हे, मुख्यालय आणि विशेष शाखेच्या कामकाजासाठी विनायक ढाकणे यांची उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अधिपत्याखाली सहायक आयुक्त गुन्हे शाखा, सहायक आयुक्त विशेष शाखा, सहायक आयुक्त प्रशासन, सहायक आयुक्त वाहतूक विभाग यांचे कामकाज चालणार आहे.

रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात
महात्मा फुले विद्यालयाच्या इमारतीत आयुक्तालय सुरू होणार आहे. मात्र, येथील इमारतीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात आॅटो क्लस्टर येथे आयुक्तालयाचे कामकाज सुरू केले आहे. दरम्यान, प्रेमलोक पार्क येथील इमारतीचे रंगकाम अंतिम टप्प्यात असून, लाईट फिटिंगचे कामही सुरू आहे. पटांगणात सपाटीकरणाचे काम सुरू आहे.

नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक
पोलीस आयुक्त यांचे कार्यालय - ०२०-२७४५०४४४ /२७४५०५५५. अपर पोलीस आयुक्त यांचे कार्यालय - ०२०-२७४५०१२५. पोलीस उप आयुक्त (परिमंडल १ व २) - ०२०-२७४८७७७७, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्ष : ०२०-२७४५०१२१, २७४५०१२२, २७४५०६६६, २७४५०८८८, २७४५८९००, २७४५८९०१.

कंट्रोल रूमचे दूरध्वनी खणखनू लागले

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले असून, नागरिकांच्या मदतीसाठी आयुक्तालयाने महत्त्वाचे संपर्क जाहीर केले आहेत. चिंचवड पोलीस वसाहतीलगत महापालिकेने व्यायामशाळेसाठी बांधलेल्या इमारतीत ‘नियंत्रण कक्ष’ सुरू करण्यात आला असून, येथील दूरध्वनी खणखनू लागले आहेत. चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे १५ आॅगस्टपासून आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले आहे. तर चिंचवड पोलीस वसाहतीलगत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: 2 crores of rent for the Commissioner office, letter to police by municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.