मोबाईल चोरट्यांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 07:58 PM2018-08-05T19:58:34+5:302018-08-05T19:59:22+5:30
माेबाईल अाणि लॅपटाॅप चाेरणाऱ्या चाेरट्यांकडून पाेलिसांनी 2 लाख 83 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अाहे.
पिंपरी : मोबाईल आणि लॅपटॉप चोरणा-या दोन चोरट्याना युनिट चारच्या पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून एकूण 2 लाख 83 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संजय बाबुराव देशमुख (वय 32, रा. भोसरी) आणि संदेश दीपक गंगावणे (वय 21, रा. सांगवी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर सुधीर हिरेमठ, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनखालील तपास पथकाने घाई व गर्दीच्या ठिकाणी, बसमध्ये चढणा-या महिलांच्या पर्समधून मोबाईल चोरणा-या संदेश या चोराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने नऊ मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार संदेशकडून एकूण 1 लाख 9 हजार 990 रुपये किमतीचे नऊ मोबाईल जप्त करण्यात आले. या तपासामुळे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
तपास पथकाने चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना संजय याला भोसरी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याच्याकडून दोन लॅपटॉप व 16 मोबाईल असा एकूण 1 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी युनिट चारचे प्रभारी अधिकारी ब्रम्हानंद नायकोडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, गणेश पाटील, पोलीस हवालदार महादेव धनगर, कैलास बोबडे, प्रमोद लांडे, पोलीस नाईक अमित गायकवाड, हेमंत खरात, पोलीस शिपाई सुशील चौधरी यांच्या पथकाने केली.