मावळात २ हजार ५६६ मतदान केंद्र, ११ हजार ३६८ मतदान अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By विश्वास मोरे | Published: May 8, 2024 05:43 PM2024-05-08T17:43:04+5:302024-05-08T17:44:11+5:30
मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतुक आराखडा तयार
पिंपरी : मावळ लोकसभेची निवडणूक दिनांक १३ मे रोजी होणार आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे १२ हजार मतदार अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता एका बोटीसह १७५ पीएमपीएमल बसेस, २१९ एसटी महामंडळाच्या बसेस, १०५ मिनी बसेस, २५ ईव्हीएम कंटेनर लागणार आहेत, अशी माहिती माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतुक आराखडा तयार केला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे नियोजन केले आहे. एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रावर एकूण ११ हजार ३६८ मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर ८३ सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानासाठी १ हजार ९५८ बॅलेट युनिट, ७५० कंट्रोल युनिट आणि ७८८ व्हीव्हीपॅट यंत्रांची आवश्यकता असून या यंत्रांची सरमिसळ करून विधानसभा निहाय त्यांचे वितरण केले आहे.
९ हजार २३६ बॅलेट युनिट
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या संपुर्ण लोकसभा कार्यक्षेत्रात २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून यामध्ये १३ लाख ४९ हजार १८४ पुरूष मतदार, १२ लाख ३५ हजार ६६१ महिला मतदार आणि १७३ तृतीयपंथी मतदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. या मतदारसंघात ३३ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८१६ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
मावळ लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मतदान व मतदानोत्तर प्रक्रियेच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता पिण्याचे पाणी, औषधे, मंडप उभारणी, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या मतदान केंद्रांवर बैठक व्यवस्था आदी सुविधांसह इतर तांत्रिक बाबींचीही पुर्तता करण्यात येणार आहे. -दीपक सिंगला (निवडणूक निर्णय अधिकारी )