जनतेचे २० कोटी लुटण्याचा डाव
By admin | Published: April 25, 2017 04:04 AM2017-04-25T04:04:46+5:302017-04-25T04:04:46+5:30
ना भय ना भ्रष्टाचार असा नारा देऊन सत्ता मिळविणारे भाजपाचे पदाधिकारी आता भय दाखवून भ्रष्टाचार करत आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री
पिंपरी : ना भय ना भ्रष्टाचार असा नारा देऊन सत्ता मिळविणारे भाजपाचे पदाधिकारी आता भय दाखवून भ्रष्टाचार करत आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदारांच्या नावाचा दुरुपयोग करून अधिकारी, ठेकेदारांना वेठीस धरत आहेत. विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची ४०० कोटी रुपयांची देयके अडकवून ठेवणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी टक्केवारीपोटी २० कोटी उकळण्याचा डाव रचला आहे, असा गंभीर आरोप स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
महापालिकेत भाजपाच्या सुरू असलेल्या पारदर्शक कारभाराचा समाचार घेतला. प्रशांत शितोळे म्हणाले, ‘‘भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे खरे रंग रूप दाखविण्यास सुरुवात केली आहे. सत्ता मिळताच अधिकारी, ठेकेदारांची पद्धतशीरपणे कोंडी सुरू झाली आहे. जुन्या कामाची चौकशी करून, तुम्ही सादर केलेली बिले खोटी आहेत, अशी दमबाजी अधिकारी आणि ठेकेदारांना केली जात आहे. सुमारे ४०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. ही बिले काढण्यासाठी २० कोटी रुपयांचा गैरव्यहार केला जाणार आहे.
स्वत:ला चाणक्य आणि लॅपटॉप मॅन समजणाऱ्या मास्टरमाइंड स्वत:च्या हुशारीचा फायदा महापालिका भिकारी होईल यासाठी करीत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या नावाचा दुरुपयोग केला जात आहे.’’
अर्थसंकल्पावर शितोळे म्हणाले, ‘‘महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमुळे आयुक्तांना अर्थसंकल्प सादर करण्यास उशीर झाला आहे. महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ९५ नुसार अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी मंजूर होणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास आयुक्तांचा अर्थसंकल्प जैसे थे मंजूर असल्याचे मानले जाते. तथापि, स्थायी समितीने आता त्यात फेरबदल करण्याचे निश्चित केले आहे.’’ (प्रतिनिधी)