स्मार्ट सिटीसाठी दोनशे कोटी, सनियंत्रण समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 03:05 AM2018-01-05T03:05:43+5:302018-01-05T03:06:00+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे़ परंतु याबाबतचा निधी महापालिकेला अजूनही मिळालेला नाही. यावर महापालिका स्तरावरील स्मार्ट सिटी सनियंत्रण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. महिनाअखेरपर्यंत सुमारे दोनशे कोटींचा निधी मिळणार असल्याचे प्रशासनाने बैठकीत सांगितले, अशी माहिती महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे़ परंतु याबाबतचा निधी महापालिकेला अजूनही मिळालेला नाही. यावर महापालिका स्तरावरील स्मार्ट सिटी सनियंत्रण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. महिनाअखेरपर्यंत सुमारे दोनशे कोटींचा निधी मिळणार असल्याचे प्रशासनाने बैठकीत सांगितले, अशी माहिती महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
महापालिका निवडणुकीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला. शहराचा तिसºया टप्प्यात समावेश झाला. डीपीआर करणे, स्मार्ट सिटी कंपनीची बैठक होण्यास विलंब झाला. स्मार्ट सिटीत समावेश होऊनही वर्षभराचा कालखंड पूर्ण होण्यास आला असतानाही केंद्राकडून निधी आलेला नाही. याबाबत महापालिका भवनात झालेल्या स्मार्ट सिटी सनियंत्रण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीस महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण आदी उपस्थित होते.
एकनाथ पवार म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामांना गती देण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थापन केली आहे. तिची बैठक प्रत्येक महिन्याला घेण्यात येते. त्यात आढावा घेण्यात येतो. स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी जागा, निविदा काढणे, प्रकल्पांचे मनुष्यबळ याविषयांवर चर्चा झाली. स्मार्ट सिटीसाठी प्राधिकरणातील पीसीएनटीडीएच्या कार्यालयाचा विचार सुरू आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल.
शिवसेना, मनसे बाहेर
महापालिका भवनातील स्मार्ट सिटीच्या बैठकीची माहिती शिवसेनेचे प्रमोद कुटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांना देण्यात आली नव्हती. दोन्ही पक्षाच्या सदस्यांना निमंत्रण नसल्याने ते महापालिका भवनात असतानाही बैठकीस उपस्थित नव्हते. याबाबत चिखले यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन नाराजी व्यक्त केली.
संचालकांची लवकरच बैठक
प्रकल्पांच्या अनुषंगाने मनुष्यबळाच्या विषयांवरही चर्चा झाली. सुरुवातीला काही निविदा काढणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले. त्यात स्मार्ट सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी पार्किंग व्यवस्था, पॅनसिटीतील आवश्यक कामे, वायफाय यंत्रणा आदी कामे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले. कामे थांबू नयेत यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे, असे प्रशासनाच्या बैठकीत सांगण्यात आले. पुढील महिन्यात संचालक मंडळाची बैठक होणार आहे.’’