पिंपरीत ड्रंक अँड ड्राईव्हचे २०२ खटले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 04:28 PM2020-01-01T16:28:30+5:302020-01-01T16:36:26+5:30
मद्यपान करून वाहन चालवत वाहतूक नियमांचे उल्लंघन
पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र असे करताना काही नागरिकांनी मद्यपान करून वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी उद्योगनगरीत २०२ खटले दाखल करण्यात आले. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली.
नववर्ष स्वागतासाठी विविध हॉटेल्स, रेस्टॉरन्टतर्फे विशेष पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. या पार्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत नागरिकांनी सरत्या वर्षाला निरोप देतानाच नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. या वेळी मद्यपान करून वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणे, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी मुख्य रस्ते, चौक अशा ठिकाणी वाहनचालकांची तपासणी केली. ब्रिथ अॅनलायझरचा वापर करून मद्यपान केले आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यात आली. यात काही वाहनचालकांनी मद्यपान केल्याचे आढळून आले. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस आयुक्तालयांतर्गत सांगवी, हिंजवडी, निगडी, पिंपरी, भोसरी, चिंचवड, चाकण, दिघी-आळंदी, देहूरोड-तळेगाव व तळवडे असे दहा वाहतूक विभाग आहेत. या विभागांत मंगळवारी (दि. ३१) रात्री वाहनांची व चालकांची कसून तपासणी करण्यात आली. या वेळी भोसरी विभागात सर्वाधिक वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवित असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करून ३६ खटले दाखल करण्यात आले. तर चाकण विभागात सर्वात कमी केवळ सहा खटले दाखल झाले.
वाहतूक विभाग ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस
सांगवी १८
हिंजवडी १८
निगडी २६
पिंपरी २७
भोसरी ३६
चिंचवड २१
चाकण ०६
दिघी-आळंदी ११
देहूरोड-तळेगाव २३
तळवडे १६
एकूण २०२