लोणावळ्यात 24 तासात 215 मिमी पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 01:07 PM2018-06-23T13:07:41+5:302018-06-23T13:09:13+5:30
आठवडाभरची विश्रांती घेतल्यानंतर पुनरागमन केलेल्या पावसानं शुक्रवारी दुपारनंतर लोणावळ्यात जोरदार हजेरी लावल्याने मागील 24 तासात शहरात तब्बल 215 मिमी (8.46 इंच) इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
लोणावळा : आठवडाभरची विश्रांती घेतल्यानंतर पुनरागमन केलेल्या पावसानं शुक्रवारी दुपारनंतर लोणावळ्यात जोरदार हजेरी लावल्याने मागील 24 तासात शहरात तब्बल 215 मिमी (8.46 इंच) इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली तर काही घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नालेसफाईची कामे यावर्षी समाधानकारक न झाल्याने पहिल्याच पावसात शहरातील मावळ चौक, गवळीवाड्यातील राशिंगकर घरासमोरील रस्ता, पांगारी चाळ, वर्धमान सोसायटी, नांगरगाव रोड, नारायणी धामकडे जाणारा रस्ता, भांगरवाडी, ट्रायोज मॉलसमोरील रस्ता याठिकाणी फुटभरापेक्षा जास्त पाणी भरल्याने याठिकाणांहून प्रवास करणे त्रासदायक ठरले होते.
लोणावळा नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यत जागून मावळ चौकातील तुंबलेली गटारे साफ करत पाणी जाण्याकरिता मार्ग मोकळा केला मात्र इतर ठिकाणची परिस्थिती जैसे थे होती. शुक्रवारी सायंकाळी सुरु झालेला पासून रात्रभर कोसळत होता. सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली आहे.