सात हजार मिळवायच्या नादात २२ लाख गमावले; साॅफ्टवेअर इंजिनियरला टास्क देऊन घातला गंडा
By नारायण बडगुजर | Published: September 7, 2023 03:27 PM2023-09-07T15:27:36+5:302023-09-07T15:29:04+5:30
हा प्रकार १५ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत मोहननगर, चिंचवड येथे घडला...
पिंपरी : हॉटेल बुकिंगचा टास्क देऊन १० हजार गुंतवूणक करण्यास सांगून त्याचा नफा म्हणून १७ हजार रुपये दिले. त्यानंतर पुन्हा पैसे घेऊन त्याचा नफा किंवा गुंतवलेली रक्कम परत दिली नाही. टास्कच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने साॅफ्टवेअर इंजिनियरला २२ लाख ३३ हजारांची फसवणूक केली. हा प्रकार १५ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत मोहननगर, चिंचवड येथे घडला.
राजू गोपाल वेंकान्ना मेरम (३५, रा. मोहननगर, चिंचवड. मूळ रा. परकाला मंडल, नदीकुडा, वारंगल) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. ६) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू मेरम हे साॅफ्टवेअर इंजिनियर आहेत. अज्ञात व्यक्तींनी टेलिग्रामच्या माध्यमातून फिर्यादी मेरम यांच्याशी संपर्क केला. त्यांना बनावट लिंक पाठवून त्याद्वारे हॉटेल बुकिंगचा टास्क पूर्ण करण्यास सांगितले. सुरवातीला त्यासाठी १० हजार रुपये गुंतवणू करण्यास सांगून त्याचा मोबदला म्हणून १७ हजार रुपये देले. त्यानंतर अज्ञातांनी पुन्हा वेगवेगळे टास्क दिले. ते टास्क पूर्ण केल्यास फिर्यादी मेरम यांना मोठी रक्कम मिळणार, असे आमिष देखील अज्ञात व्यक्तींनी दाखवले. त्यानुसार फिर्यादी मेरम यांनी टास्क पूर्ण करत असताना २२ लाख ३३ हजार ७५१ रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी मेरम यांना कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.