पिंपरी-चिंचवड शहरात आढळल्या २३५९ कुणबी नोंदी
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: November 22, 2023 04:50 PM2023-11-22T16:50:39+5:302023-11-22T16:52:05+5:30
शिक्षण विभागातील सर्वांधिक पाच लाख ८३ हजार ८३२ नोंदी तपासल्या. त्यात दोन हजार ३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत
पिंपरी : महापालिकेच्या विविध विभागांतील जुनी कागदपत्रे, दस्तऐवज व दप्तरामधील नोंदी तपासणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत २३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. कागदपत्रे तपासणीचे काम शुक्रवारपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका नोडल अधिकारी अविनाश शिंदे यांनी दिली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राज्यात संघर्ष सुरू झाला आहे. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर पुढे आली आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्या-त्या जिल्ह्यातील कुणबीच्या नोंदी शोधण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महापालिका स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीकडून नोंदी तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातील सर्व स्तरावर विविध सरकारी यंत्रणा नोंदी शोधण्याचे काम करीत आहेत.
कर संकलन, वैद्यकीय विभागातील एकही नोंद नाही...
राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील सन १९४८ ते १९६७ या कालावधीतील दस्तऐवज व कागदपत्रांतील नोंदणी तपासण्यात येत आहेत. शिक्षण, कर संकलन, वैद्यकीय व लेखा विभागांतील या कालावधीतील उपलब्ध दस्तऐवज, कागदपत्र व नोंदीच्या तपासणीचे काम सुरू आहे. वैद्यकीय विभागातील दोन हजार २२२ आणि कर संकलनमधील ११ हजार १८३ कागदपत्रांवरील नोंदी तपासण्यात आल्या. त्यात एकही मराठा-कुणबी नोंद आढळून आलेली नाही.
शिक्षण विभागात आढळल्या नोंदी...
शिक्षण विभागातील सर्वांधिक पाच लाख ८३ हजार ८३२ नोंदी तपासल्या. त्यात दोन हजार ३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा अशा जातीच्या नोंदी तपासण्याचे नव्याने आदेश शासनाने दिले आहेत. त्याचे वर्गीकरण करून तसा स्वतंत्र अहवाल दिला जाणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या संबंधित विभागास सूचना देण्यात आल्या आहेत.