मिळकतकर उत्पन्नात २४ कोटींची भर
By admin | Published: July 6, 2017 03:18 AM2017-07-06T03:18:51+5:302017-07-06T03:18:51+5:30
मिळकतकराच्या उत्पन्नात भर पडत आहे. पहिल्या तिमाहीत मालमत्ताकरातून १८७ कोटी रुपयांचा महसूल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मिळकतकराच्या उत्पन्नात भर पडत आहे. पहिल्या तिमाहीत मालमत्ताकरातून १८७ कोटी रुपयांचा महसूल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोषागारात जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २४ कोटी रुपयांचा भरणा अधिक झाला आहे. तसेच आॅनलाइन भरणाही वाढला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २० लाखांवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पुनरुत्थान अभियानांतर्गत (जेएनएनयुआरएम) शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल ही शहराची ओळख बनली आहे. येथील पायाभूत सोयी-सुविधा, महापालिकेने उभारलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे हा परिसर मालमत्ताधारकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. त्यामुळे शेकडो मालमत्तांची भर पडत आहे. पयार्याने महापालिकेचा मालमत्ताकर भरणा वाढला आहे.
मालमत्ताकर ३० जूनपर्यंत आगाऊ भरणाऱ्यांना सामान्यकरात १० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे आगाऊ करभरणा करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. या सवलतीचा फायदा १ लाख ६९ हजार करदात्यांनी घेतला. त्यांना ९ कोटी ८० लाख रुपये सूट दिली.
आॅनलाइनचाही वापर
३० जूनअखेरीस रोख अथवा डीडीद्वारे ६७ हजार ४०६ मालमत्ताधारकांनी ३७ कोटी ९२ लाख रुपये करभरणा केला, तर धनादेशाद्वारे २४ हजार ६६४ जणांनी ६७ कोटी १९ लाख रुपये करभरणा केला. असा एक लाख ६९ हजार २५२ करदात्यांकडून १८७ कोटी ४५ लाख रुपयांचा महसूल तिजोरीत जमा झाला, असे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले.