चिंचोलीत २४ तास बत्ती गुल
By Admin | Published: April 29, 2017 04:04 AM2017-04-29T04:04:22+5:302017-04-29T04:04:22+5:30
महावितरणकडून चिंचोली परिसरात गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी दहापर्यंत बंद
देहूरोड : महावितरणकडून चिंचोली परिसरात गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी दहापर्यंत बंद ठेवण्यात आल्याने चिंचोलीतील पानसरे आळी व भेगडे आळीसह विविध भागांतील नागरिकांना उकाड्याने अक्षरश: हैराण केल्याने गुरुवार-शुक्रवारची रात्र जागून काढण्याची वेळ आली. महावितरणने पूर्वसूचना न देता गुरुवारी दिवसभर व रात्रभर वीज खंडित केल्याने, तसेच तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
चिंचोली परिसरात पूर्वसूचना न देता सकाळी दहापासून वीजपुरवठा खंडित केला होता. गुरुवार असल्याने दुरुस्तीची कामांमुळे वीज बंद ठेवण्यात आली असावी असा अंदाज नागरिकांनी बांधला होता. मात्र, सायंकाळी सातपर्यंत चिंचोलीच्या सर्व भागात वीजपुरवठा खंडित होता. सातच्या सुमारास काही भागातील वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, चिंचोलीच्या उर्वरित भागातील वीजपुरवठा सुरू न झाल्याने काही नागरिकांनी देहू येथील तक्रार केंद्राच्या भ्रमणध्वनीवर तक्रार केली. संबंधित कर्मचाऱ्याने, देहूगावात काम सुरू असून, त्यानंतर तासाभराने चिंचोलीत येऊन वीजपुरवठा सुरळीत करू अथवा शुक्रवारी सकाळी वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असे टाळाटाळ करणारे व बेजबाबदार उत्तर दिले. मात्र गुरुवारी रात्री नऊपर्यंत वाट पाहूनही वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याने संबंधित अभियंत्यांशी संपर्क साधला असता, चिंचोलीतील दुरुस्तीचे काम शुक्रवारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महावितरणकडे तक्रार आल्यानंतर ४८ तासांत तक्रार निवारण करण्यात येते असे उत्तर दिले. तसेच त्यांच्याकडे देहू आणि तळवडे दोन भाग असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण असल्याने दोन्हींकडे लक्ष देणे शक्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले. चिंचोली परिसर भोसरी या शहरी विभागात येत असताना पूर्वसूचना न देता २४ तास वीज खंडित ठेवल्याबाबत नागरिक महावितरणच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
गुरुवारी सकाळपासून वीजपुरवठा बंद असल्याने गुरुवारी दिवसभर व रात्रभर उकाड्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. अनेकांना रात्र जागून काढावी लागली. अनेकांच्या मोबाइल फोनची बॅटरी उतरल्याने संपर्क साधणे अवघड झाले होते. चिंचोलीत एक फेज जाण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे गावाचा बहुतांश भाग अंधारात राहत असल्याने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)