विक्रीसाठी आणलेला २५ किलो गांजा जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 01:01 PM2024-01-15T13:01:12+5:302024-01-15T13:01:41+5:30
रावेत येथील म्हस्के वस्तीत शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली....
पिंपरी : विक्रीसाठी आणलेला २५ किलो गांजा पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला. यामध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली. रावेत येथील म्हस्के वस्तीत शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
कृष्णा मारुती शिंदे (२७, रा. शिंदेवस्ती, शितपूर, ता. कर्जत, जि. अहमदनगर), अक्षय बारकू मोरे (२९, रा. कान्होबा वस्ती, पाटेगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर), हनुमंत भाऊसाहेब कदम (३५, रा. कुसडगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह वसंत डुकळे (रा. आंबी, ता. परांडा, जि. धाराशिव) आणि सौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली) यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार सदानंद रुद्राक्षे यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत परिसरातील म्हस्के वस्ती येथे बीआरटी रस्त्याच्या बाजूला तिघे जण संशयितपणे थांबले असून, त्यांच्याकडे गांजा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कृष्णा, अक्षय आणि हनुमंत या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २५ लाख ६९ हजार १०० रुपये किमतीचा २५ किलो ६९१ ग्रॅम गांजा, कार, चार मोबाइल फोन आणि १,६०० रुपये रोख रक्कम, असा ३० लाख ५५ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
संशयिताकडे चौकशी केली असता त्यांनी हा गांजा वसंत डुकळे याच्याकडून आणला असल्याचे समोर आले. त्यांनी आणलेला गांजा ते सौरव निर्मल याला विकणार असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे वसंत आणि सौरव यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.