तोंडावर मिरची पावडर टाकून ज्येष्ठ नागरिकाचे २७ लाख लुटले; चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:43 PM2023-11-30T12:43:13+5:302023-11-30T12:44:09+5:30
संशयितांनी फिर्यादी यांच्याकडील कामगार मोहन वैद्य यांना देखील दोन वेळा लुटण्याचा ‘प्लॅन’ केला होता
पिंपरी : दोघांनी ज्येष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावर मिरची पावडर टाकून २७ लाख २५ हजार ८०० रुपयांची बॅग हिसकावून नेली होती. निगडीतील यमुनानगर येथे १४ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ३५ हजार ४०० रुपयांची रोकड, तसेच इतर मुद्देमाल हस्तगत केला.
विशाल साहेबराव जगताप (२५, रा. मोरेवस्ती, चिखली, मूळगाव संक्रापूर, ता. राहुरी, जि. अहमदनगर), लालबाबू बाजीलाल जयस्वाल (२८, रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. चिखली), जावेद अकबर काझी (५०, रा. किवळे), अभिषेक दयानंद बोडके (१९, रा. मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रकाश भिकचंद लोढा (६८, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोढा यांचा मनी ट्रान्स्फरचा व्यवसाय आहे. लोढा हे १४ ऑक्टोबर रोजी २७ लाख २५ हजार ४०० रुपये घेऊन रात्री पावणेअराच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी लोढा यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यानंतर लोढा यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर टाकून धक्काबुक्की करून लोढा यांच्याकडील पैशांची पिशवी हिसकावून निघून गेले.
याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकांनी समांतर तपास सुरू केला. फिर्यादी लोढा यांनी रोकड जमा केलेल्या ठिकाणांची पोलिसांनी पाहणी केली. त्यात दोन अनोळखी निष्पन्न झाले. त्यानुसार विशाल जगताप यास पकडले. चोरीच्या रकमेपैकी विशाल याच्या वाट्यास आलेली आठ लाख एक हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत केली. त्यानंतर लालबाबू, जावेद आणि अभिषेक यांनाही पोलिसांनी पकडले.
तांत्रिक विश्लेषणावरून संशयित धीरेंद्र हा मनोज जयस्वाल याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार धीरेंद्र याला ताब्यात घेतले. मनोज याने त्याच्याकडे १३ लाखांची रोकड ठेवली होती. त्यापैकी काही रक्कम त्याने मनोज याच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठविली. क्रेडिट कार्डचे पैसे भरले, कर्ज भरले, इतर संशयितांची विमानाचे तिकिटे काढली, तसेच सोन्याचे दागिने व एक मोबाइल फोन खरेदी केला, असे तपासात निष्पन्न झाले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, संतोष पाटील, सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, उपनिरीक्षक इम्रान शेख, भरत गोसावी, गणेश माने, दरोडाविरोधी पथक, खंडणीविरोधी पथक व तांत्रिक विश्लेषण विभागातील अंमलदार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
खाते गोठवण्याची कारवाई
धीरेंद्र याने पाठविलेल्या रकमेचे वेगवेगळे खाते गोठवून इतर मालमत्ता हस्तगत करण्यात येत आहे. संशयितांनी फिर्यादी लोढा यांच्याकडील कामगार मोहन वैद्य यांना देखील दोन वेळा लुटण्याचा ‘प्लॅन’ केला होता; परंतु तो अयशस्वी झाला होता.