संगणकीय माहितीची फेरफार करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातून चोरले शिष्यवृत्तीचे २८ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 05:02 PM2021-07-08T17:02:57+5:302021-07-08T17:03:05+5:30
एका अँकॅडमीमधील संगणक प्रणालीचा पासवर्ड चोरून अज्ञात इसमाने त्यातील डेटाबेस चोरला. त्यानंतर संगणकाचा अक्सेस घेऊन त्यातील विद्यार्थ्यांचे बँक खात्यामध्ये फेरफार केला
पिंपरी: अँकॅडमीतील संगणकाचा पासवर्ड चोरून त्याचा अक्सेस घेत एका अज्ञात व्यक्तीने संगणकातील माहितीमध्ये फेरफार केला. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये बदल करत तीन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे दुसऱ्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून २८ हजार ९३७ रुपयांच्या शिष्यवृत्तीची चोरी केली. हा प्रकार २४ एप्रिल ते १५ मे दरम्यान आयआयएमएस बिल्डिंग, चिंचवड येथे घडला.
प्रसाद प्रभाकर शाळिग्राम (वय ४१, रा. बुधवारपेठ पुणे) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ज्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे गेले अशा अरुण राजेंद टिकरे (रा. भवानीपेठ पुणे), जोगेश्वरी विक्रांत भिंगे (रा. पाषाण) या दोघांसह संगणाक प्रणालीमध्ये फेरफार करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळीग्राम यांची चिंचवड येथे अँकॅडमी आहे. या अँकॅडमीमधील संगणक प्रणालीचा पासवर्ड चोरून अज्ञात व्यक्तीने त्यातील डेटाबेस चोरला. त्यानंतर संगणकाचा अक्सेस घेऊन त्यातील विद्यार्थ्यांचे बँक खात्यामध्ये फेरफार केला. त्यानंतर तीन विद्यार्थ्यांच्या नावाने आलेली शिष्यवृत्ती अरुण टिकरे आणि जौगेश्वरी भिंगे यांच्या बँक खात्यावर टाकली. संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गुन्हा नोंदविणयात आला असून संगणाक प्रणालीमध्ये फेरफार करणाऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.